यावर उपवीति करून दैवपात्राच्या सभोवार कुश व यव टाकावेत. व पितरांच्या पात्रांच्या सभोवार तिल टाकून गायत्रीमंत्राने अन्न प्रोक्षण करावे, व मंत्ररहित उदक सिंचन करून उजवा हात व वर व डावा हात खाली याप्रमाणे देवाकडे व डावा हात वर व उजवा हात खाली याप्रमाणे पितरांकडे स्वस्तिकार हातांनी पात्र धरावे. त्याविषयी मंत्र
'पृथिवीतेपान्म द्यौरपिधानं ब्राह्मणस्वा मुखेमृतं जुहोमि ब्राह्मणानांत्वा विद्यावतां प्राणापानयोर्जुहोम्यक्षितमसि मामैषांक्षेष्टा अमुत्रामुष्मिल्लोके'
हा मंत्र अपस्तंब, कात्यायन, इत्यादिकांनी नानाप्रकारे पठण केला आहे म्हणून जसा संप्रदाय असेल तसा म्हणावा. असे अभिमंत्रण करून 'अतोदेवा' किंवा 'इदविष्णु' यातून एक ऋचा म्हणून 'विष्णोहव्यंरक्षस्व' असे देवांकडे व 'कव्यंरक्षस्व' असे पितरांकडे म्हणून उपड्या हाताने उपडा नख वर्ज्य असा ब्राह्मणाचा अंगुष्ट ठेववून प्रदक्षिण फिरवावा. पितरांकडे अप्रदक्षिण फिरवावा. येथे कात्यायनांस 'अपहता' या मंत्राने यव देवांकडे व तिल पितरांकडे पात्राचे सभोवार टाकण्याविषयी सांगितले आहे. यावर डाव्या हाताने पात्राला स्पर्श करून
'अमुक विश्वेदेवा देवता इदमन्नं हव्यमयं ब्राह्मण आहवनीयार्थे इयंभुर्गया अयंभोक्ता गदाधर इदमन्नं ब्रह्म इदं सौवर्ण पात्रमक्षय्य वटच्छायेयं अमुक देवेभ्यः इदमन्नं सोपस्करममृतरूपं परिविष्टं परिवेक्षमाणं चातृप्तेः स्वाहा हव्यं नमोनमम ॐ तत्सत्
असा मंत्र म्हणून यव व दर्भासहित उदक उजव्या हाताने पात्राच्या डाव्याभागी भूमीवर सोडावे. देवाकडच्या दुसर्या ब्राह्मणाविषयीही असेच करावे. यावर 'यदेवासः' या मंत्राने प्रार्थना करावी. व पित्र्यधर्माने पितरांच्या पात्रांचे आलंभन व अंगुष्ठ निवेशन येथपर्यंत कर्म झाल्यानंतर डाव्या हाताने पात्र धरून 'पितादेवता' असा ऊह, एक ब्राह्मण असल्यास
'पित्रादयो यथा नामगोत्रा देवता इदमन्नं कव्यं' इत्यादि 'इदं राजतं पात्रमक्षय्य वटच्छायेयं अस्मत् पित्रेऽमुकनाम गोत्ररूपाय'
असे व त्रयीच्या ठायी एक ब्राह्मण असेल तर
'अस्मत्पितृपितामह प्रपितामहेभ्योमुक गोत्रनामरूपेभ्यः इदमन्नं सोपस्करममृतरूपं परिविश्टं परिवेक्ष्यमाणं चातृप्तेः स्वधाकव्यं नमोनमम ॐ तत्सत्'
असा मंत्र म्हणून तिळ, कुश व उदक पितृतीर्थाने डाव्या हाताच्या खाली केलेल्या उजव्या हाताने पात्राच्या दक्षिणेस भूमीवर सोडावे. याप्रमाणे दुसरीकडेही जसे दैवत असेल तसा ऊह करावा. पितृस्थानी अनेक ब्राह्मण असतील तर ३।३ ब्राह्मणांचे ठायी 'पित्रे' इत्यादि एकवचनांताने त्याग करावा. व पुढेही तीन तीन ब्राह्मणांचे ठायी असेच जाणावे. नंतर 'इयेचेह' या मंत्राने एकदा प्रार्थना करावी. अतिथि असेल तर देवधर्माने 'देवताये इदमन्नं' इत्यादि म्हणून 'येदेवास' इत्यादि मंत्र म्हणावा. नंतर अपसव्याने
'देवताभ्यः० पितृभ्यः० सप्तव्या० अमूर्ताना० ब्रह्मार्पण० हरिर्दाता० चतुर्भिश्च० ॐतस्त ब्रह्मार्पणमस्तु येषामुद्दिष्ट्म येशामक्षय्या प्रीतिरस्तु'
असे मंत्र म्हणून तिलोदक सोडावे. व सव्य करून
'एकोविष्णु० अन्नहीनंक्रियाहीनं मंत्रहीनंचयद्भवेत् तत्सर्वमच्छिद्रंजायताम्'
असे म्हणून ब्राह्मणांनी 'जायतां सर्वमच्छिद्रं' असे प्रतिवचन दिल्यावर
'अनेन पितृयज्ञेन पितृयज्ञरूपी जनार्दनवासुदेवः प्रियतां'
असे म्हणून तिल व कुश यासहित उदक सोडावे. असा आचार आहे.