जेव्हा अशौचीयाचे अन्न नसून अशौचीयाने स्पर्श केलेले मात्र अन्न भक्षण करितो तेव्हा बुद्धिपूर्वक भोजन केल्यास कृच्छ्र प्रायश्चित्त करावे. न कळत भोजन केल्यास तदर्ध करावे. असे स्मृत्यर्थसार ग्रंथात म्हटले आहे. अशौचीयाने स्पर्श केलेले अशौची स्वामीचे अन्न भक्षण करणाराने तर अशौची स्वामीचे अन्न भक्षण केले म्हणून व त्याने स्पर्श केलेले अन्न भक्षण केले म्हणून अशी २ प्रायश्चित्ते समुच्चयाने करावी. अशौच स्वामिक आमान्न ग्रहण केल्यास सांगितलेल्या प्रायश्चित्तातून अर्धे करावे. त्यास अशौच नाही. दाता व भोक्ता या दोघांस अज्ञात असे जननाशौच किंवा मृताशौच असता दोष नाही. दोहोतून एकास ज्ञात असता दोष नाही. त्यात दात्यास ज्ञात असून भोक्त्यास अज्ञात असेल तर भोक्त्यास अल्प प्रायश्चित्त व दात्यास अज्ञात असूनही भोक्त्यास ज्ञात असेल तर पूर्णच प्रायश्चित्त; भोजननिमित्तक अशौच असले तरी कर्मलोप नाही.
कसलाही अल्प संबंध असलेला गृहस्थ मरण पावल्यास सचैल स्नान करावे. असे त्रिंशश्लोकीत आहे व स्मृत्यर्थसारातही असेच आहे. याचा अर्थ असा की, एक दिवस इत्यादि अशौच उत्पन्न करणारा जो अल्प संबंध त्याने युक्त असलेला शालक, जामाता इत्यादि मरण पावल्यास सचैल स्नान करावे. सर्व ठिकाणी लहान किंवा मोठे मृताशौच प्राप्त झाले असता तात्काली व समाप्तिकाली स्नान करावे. अथवा १० दिवसांचे अशौचावाचून इतर पक्षिणी, त्रिदिन इत्यादि अशौचास कारणीभूत असलेले जे संबंध त्यांनी युक्त असलेले बंधुत्रय, मातुल, उपनीत सपिंड, इत्यादिक मरण पावल्यास देशांतरी व कालांतरी स्नान आहेच. तसेच ज्यास सन्निहितकालि अशौच प्राप्त होते त्यास अतिक्रांतकाली स्नान आहेच. व ज्यास सन्निहितकालीही स्नान मात्र आहे त्यास कालांतरी स्नानही नाही. किंवा अशौचास कारणीभूत असलेल्या संबंधाहून इतर संबंध म्हणजे शालकपुत्र, विवाहित कन्येस पितृव्याचा पुत्रादिक, भगिनीस भ्रात्याचा पुत्र, इत्यादिक अशा संबंधांनी युक्त असणारास अशौच नाही. पण स्नान मात्र आहेच. अल्प स्वल्प संबंधाविषयी अशौच नाही तथापि जवळ असता स्नान मात्र सर्वत्र करावे असा अर्थ. असे हे तीन पक्ष शिष्टाचारात आढळतात. ते योग्य आहेत असे वाटते.