दुसरा कोणी अधिकारी नसेल तर पिता, माता, मातामह इत्यादिकांचे दहनादिक अंत्यकर्म ब्रह्मचार्याने करावे, व कर्मांगभूत १० दिवस अस्पृश्यत्व लक्षण अशौच धरावे. त्याकालीही ब्रह्मचार्याने अशौची यांचे अन्न भक्षण करू नये व अशौची यांस स्पर्श होईल असे एकत्र राहूही नये. अन्नभक्षण व एकत्र वास ही दोन्ही केल्यास प्रायश्चित्त व पुनरुपनयनही करावे. पूर्वोक्त पिता इत्यादिकांव्यतिरिक्तांचे दहनादिक अंत्यकर्म केल्यास ब्रह्मचार्याने अशौचानंतर कृच्छ्रत्रय प्रायश्चित्त व पुनरुपनयन करावे. पित्रादिकांचे दहन मात्र करणे असता १ दिवस अशौच धरावे. येथे सर्व ठिकाणी ब्रह्मचार्याने संध्या, अग्निकार्य इत्यादि कर्माचा लोप नाही. ब्रह्मचार्याहून अन्यासही दहनादिनिमित्त संसर्ग अशौच असल्यास ब्रह्मयज्ञादि नित्यकर्माचा लोप नाही, असे सांगितले आहे. त्यात देवपूजा, वैश्वदेव इत्यादिक दुसर्याकडून करवावे, स्वतः करण्यास योग्य असेल ते स्वतःच करावे. ब्रह्मचार्याने पिता इत्यादिकांचे अंत्यकर्म केले नाही तर त्यास पिता इत्यादि सपिंडाचे त्रिरात्र अशौच धरावे.