गंगादि तीर्थांची प्राप्ति असता अर्घ्य, आवाहन, द्विजांगुष्ठनिवेशन, तृप्तिप्रश्न, विकिरविसर्जन, दिग्बंध, ही वर्ज करून सकन्महालयाप्रमाणे सर्व पितृगणांस उद्देशून धुरिलोचन संज्ञक विश्वेदेवासहित तीर्थश्राद्ध करावे. अग्नौकरण कृताकृत आहे. अग्नौकरण करणे यापक्षी तीर्थजलासमीप श्राद्ध कर्तव्य असेल तर प्राकृत मंत्रयुक्त तीर्थजलात करावे, नाही तर ब्राह्मणाचे हस्तादिकांवर करावे. पिंड तीर्थात टाकावे, असे आहे. तीर्थवासी ब्राह्मण गुणहीन असले तरी तीर्थश्राद्धाविषयी तेच मुख्य होत. ते मिळतील तर दुसरे सांगावेत. तीर्थश्राद्धी श्राद्धभूमी व अन्नादि द्रव्ये कावळे, कुत्रे इत्यादिकांनी पाहिली तरी त्यास दोष नाही. तीर्थश्राद्धांगतर्पण दर्शाप्रमाणे पूर्वी करावे. देशकालांचा उच्चार करून व सर्व पितृगणांचा उच्चार करून व
'एतेषाममुकतीर्थप्राप्तिनिमित्तकंतीर्थश्राद्धंसपिण्डंसदैवसद्यःकरिष्ये'
असा संकल्प करावा. धूरिलोचन विश्वेदेवादि सर्व कृत्य सकृन्महालयाप्रमाणे करावे. साग्निक सपत्नीकासच तीर्थयात्रेविषयी अधिकार आहे. निरग्निक असेल तर अपत्नीकांसही अधिकार आहे. स्त्रियेने स्नान, दान, तीर्थयात्रा, नामस्मरण, इत्यादिक पुत्रादिकांच्या अनुमतीनेच करावे. सौभाग्यवती स्त्रीने पतीबरोबरच यात्रादिक करावे.