और्ध्वदेहिक सर्मारंभास उपयोगी असा नारायणबलि इत्यादि प्रकारः-- त्यांत दुर्मरणें, आत्महत्या, असावधपणानें, उदकादिकांपासून मरण व पतितादि मरण, हीं असतां पूर्वोक्त व्यवस्थेनें '' अमुकगोत्रस्यामुकशर्मणोऽमुकदोषनाशार्थमौर्ध्वदेहिके संप्रदानत्व योग्यता सिद्धर्थ अमुक प्रायश्चित्तममुक दानं वा करिष्ये '' इत्यादि संकल्प करुन तें तें प्रायश्चित्त व दान करावें. प्रायश्चित्त करण्यास असमर्थ असल्यास दानच करावें. '' नंतर अमुक गोत्रामुकशर्मणोमुक दुर्मरण दोषनाशार्थमौर्ध्वदेहिक प्रदानत्व योग्यतासिद्धर्थ नारायणबलिं करिष्ये '' असा संकल्प करुन पूर्वार्धात सांगितला जो संततिफलक कामनिक नारायणबलि त्याप्रमाणें सर्व कर्म करावें. वर्षातीं करणें हा पक्ष असतां असें करावें. तत्कालीं करणें हा पक्ष असेल तर पूर्वी सांगितल्याच्या दुप्पट प्रायश्चित्ताचा संकल्प करुन शुक्ल पक्षांतील एकादशी इत्यादि कालाची अपेक्षा न करिता लागलीच सांगितलेला संकल्प करुन यथाविधि स्थापित केलेल्या २ कलशांवर २ सुवर्णप्रतिमा स्थापाव्या व त्या प्रतिमांवर विष्णू व वैवस्वतयम यांचें आवाहन करुन पुरुषसूक्तानें व ' यमाय सोमं ० ' या मंत्रानें क्रमानें षोडशोपचार पूजा करावी व त्याच्या पूर्वेस रेखेवर दक्षिण दिशेस अग्रें होतील असे दर्भ पसरुन ' शुंधंतां विष्णुरुपी अमुक प्रेत ' असें म्हणून १० ठिकाणी उदक देऊन मध, घृत व तिल मिश्र केलेले भाताचे दहा पिंड '' अमुकगोत्राऽमुकशर्मप्रेत विष्णुदेवतायंतेपिंडः '' असें म्हणून दक्षिणसंस्थ असे प्राचीनावीति, इत्यादि पितृधर्मानें द्यावे. नंतर गंधादिक उपचारांनीं त्या पिंडांची पूजा करुन पिंडप्रवाहनापर्यत कर्म करुन ते पिंड नदींत टाकावे. दुसर्या दिवशीं किंवा तत्कालीं पूर्वी स्थापिलेल्या विष्णूची पूजा करुन एका ब्राह्मणाचे ठायी किंवा ब्राह्मण न मिळेल तर दर्भबटूचे ठायीं विष्णुरुपी प्रेताचे पूर्वी आवाहन करुन पादप्रक्षालनापासून तृप्ति प्रश्नापर्यंत कर्म करावे. नंतर त्या ब्राह्मणाचे समीप रेखा काढून त्यावर दर्भ पसरावे व त्या दर्भीवर उदक देऊन त्यावर सव्व्यानें ' विष्णवे ब्रम्हणे शिवायच सपरिवाराय यमायच ' असें म्हणून चौघांस ४ पिंड द्यावे व अपसव्यानें ' विष्णुरुपी प्रेतामुक गोत्र नामायंते पिंडः ' असें म्हणुन पांचवा पिंड द्यावा व तशीच पूजा करुन पिंड प्रवाहनान्त कर्म केल्यावर ब्राह्मणाचें आंचवणें इत्यादि देऊन, ब्राह्मणांकडून प्रेतास तिलांजलि देववावा. तिलांजलि देतांना ' अमुक गोत्रायामुक शर्मणे विष्णुरुपिणे प्रेताय तिलतोयांजलिः ' असा मंत्र म्हणावा. ब्राह्मण न मिळाल्यास स्वतः द्यावा. नंतर '' अनेन नारायणबलि कर्मणा भगवान विष्णुरिमममुंक प्रेतं शुद्धमपापमर्ह करोतु ' असें ब्राह्मणांकडून वदवावें. काम्य प्रयोगांत व या प्रयोगांत संकल्प व नामगोत्रांचा उच्चार याविषयीं विशेष प्रकार स्पष्टच आहे. पूर्वीच्या काम्य प्रयोगांत ' काश्यप गोत्र देवदत्त प्रेत ' इत्यादि उच्चार करावा. या प्रयोगांत तर गोत्र न नाम यांचें ज्ञान असल्यामुळें दुर्मरणानें मृत झालेल्याचें जें नाम व गोत्र असेल तेंच उच्चारावें. याप्रमाणें संकल्पविशेषाविषयीं हेतु स्पष्टच आहे. याप्रमाणें दुर्मरण असतां अंत्य कर्माच्या अधिकारासाठीं नारायणबलीचा प्रयोग सांगितला.