प्रत्येक मासांत शुक्ल पंचमीच्या दिवशीं उपोषण किंवा नक्त करुन पांच फणा असलेला पिठाचा नाग करावा; व अनंत, वासुकी, शंख, पद्म, कंबल, कर्कोटक, अश्वतर, धृतराष्ट्र, शंखपाल, कालिय, तक्षक व कपिल, याप्रमाणें १२ नांवांनी १२ महिन्यांत पूजा करुन पायसानें ब्राह्मणांस भोजन घालावें; व वर्षाती सुवर्ण नाग व प्रत्यक्ष गाय यांचें दान करुन नारायणबलि करुन दहन, अशौच; इत्यादिक करावें. अथवा ' नमो अस्तु सर्पेभ्यो ०' या मंत्रानें ३ घृतांच्या आहुतींनीं होम करावा. पंचमीस ८० गुंजा सुवर्णाचा नाग करुन दूध व घृत यांनीं युक्त असलेल्या पात्रांत ठेवावा, व त्याची पूजा करुन तो ब्राह्मणाचा द्यावा. नागदंशानें मृत झाला असतां हें प्रायश्चित्त शंभूनें सांगितलें आहे. नंतर नारायणबलि, इत्यादि विधि करावा.