अशौचाचा अपवाद - हा अपवाद १ कर्त्यापासून, २ कर्मापासून, ३ द्रव्यापासून,
४ मृतदोषापासून व ५ विधानापासून असा पाच प्रकारचा आहे.
त्यात कर्त्याच्या योगाने अपवाद आहे तो असा - संन्यासी व ब्रह्मचारी यांस सपिंडाचे जननाशौच व मृताशौच नाही. माता व पिता मृत झाल्यास संन्यासी व ब्रह्मचारी यांनी अवश्य सचैल स्नान करावे. ब्रह्मचार्याची सोडमुंज झाल्यावर ब्रह्मचर्यदशेत असता जे पिता इत्यादि सपिंड मरण पावले असतील त्यांचे त्रिरात्र अशौच धरून त्यास त्याने उदकदान करावे. शवामागून जाणे, शव पाहणे; या निमित्तांचे अशौच ब्रह्मचार्यासही आहेच. पिता इत्यादिकांचे अंत्यकर्म केयास ब्रह्मचार्यास अशौच आहेच. ज्यांनी पुर्वी प्रायश्चित्ते आरंभिली असतील तर त्यास प्रायश्चित्तानुष्ठानसमयी अशौच नाही. प्रायश्चित्ताची समाप्ती झाल्यावर त्रिरात्र अतिक्रांत अशौच त्याने धरागे. कर्मांगभुत नांदीश्राद्ध ज्यांनी केले असेल त्यास ते कर्म समाप्त होईपर्यंत त्या कर्मास उपयोगी जे कार्य त्यात पीडा, संकट इत्यादि असता अशौच नाही. जननाशौचात व मृताशौचात असता मरणसमय प्राप्त झाल्यास अशौच नाही. यावरून दानादिक व वैराग्य असता मातुलास संन्यासही होतो, असे निर्णयसिंधु इत्यादि ग्रंथात आहे. देशपीडा, दुष्काळ इत्यादि मोठी आपत्ति असता तात्कालिक शुद्धि. आपत्ति दूर झाल्यावर अशौच दोष असेल तर अवशिष्ट अशौच आहेच.
आता कर्माच्या योगाने अपवाद आहे तो असा - ज्याचे अन्नसत्र आहे त्यास अन्नादि दानाविषयी अशौच नाही. प्रतिग्रह करणार्यास आमान्न ग्रहणाविषयी दोष नाही. पक्वान्नाचे भोजन केले तर तीन रात्र दुग्धपानव्रत करावे. पूर्वी ग्रहण केलेल अनंतव्रतादिक, एकादशी इत्यादि व आरंभिलेले कृच्छ्रादिव्रत याविषयी अशौच नाही. त्यातही स्नानादिक शरीरसंबंधी नियम स्वतः करावे. अनंतपूजादिक दुसर्याकडून करवावे. ब्राह्मणभोजनादि करणे ते अशौचनिवृत्तिनंतर करावे. राजा इत्यादिकास प्रजापालनादिकाविषयी अशौच नाही. ऋत्विजांस मधुपर्क पूजेनंतर त्या कर्माविषयी अशौच नाही. यावरुन आधान, पशुबंध इत्यादिक ज्या यज्ञात मधुपर्कपूजा सांगितली नाही त्या यज्ञात ऋत्विकवर्ण केले तरी त्यास टाकून दुसरे ऋत्विज करावे. ज्यांनी यज्ञदीक्षा धारण केली त्यास दीक्षेने इष्टि झाल्यावर अवभृथ स्नानापर्यंत यज्ञकर्माविषयी अशौच नाही. दिक्षित व ऋत्विक यांनी फक्त स्नान करावे. अवभृथाचे पूर्वी अशौच नाहीच. अवभृथस्नान तर अशौचात होत नाही, असे निर्णयसिंधूत सांगितले आहे. कर्माची समाप्ति झाल्यावर पूर्वी सांगितल्याप्रमाणे त्रिरात्र अशौच धरावे. रोगभय व राजभय इत्यादिकांचा नाश करण्यासाठी आरंभलेल्या शांतिकर्मात अशौच नाही. ज्याचे कुटुंब क्षुधेने पीडित झाले असेल त्यास प्रतिग्रहाविषयी अशौच नाही. पुनःपुनः अध्ययन विसरणारास अधित वेदशास्त्राच्या अध्ययनाविषयी अशौच नाही. वैद्यास नाडीस्पर्शाविषयी अशौच नाही. श्राद्धाविषयी तर पूर्वी सांगितलेच आहे. मूर्तीची अर्चा, चौल, उपनयन, विवाहादिउत्सव, तडागादिकांचा उत्सर्ग, कोटिहोम, तुलापुरुषदान इत्यादि कर्माविषयी नांदीश्राद्ध झाल्यावर अशौच नाही. पूर्वी संकल्पिलेला, पुरश्चरणजप व अविच्छेदाने संकल्पिलेले हे हरिवंशश्रवणादिक ही एकदा आरंभिल्यावर मग अशौच नाही. कालादि नियमाचा अभाव असेल तर स्तोत्र, हरिवंशादिक अशौचात वर्ज्य करावे. हा सर्व अशौचाचा अपवाद अनन्यगतिक, आर्ति, याविषयी जाणावा, असे निर्णयसिंधु व नागोजीभट्टकृत अशौचनिर्णयग्रंथात सांगितले आहे. यावरून अनन्यगतिकत्व इत्यादि पाहूनच अशौचाचा अभाव योजावा. याबद्दल जे सांगावयाचे ते पूर्वार्धात त्या त्या स्थली सांगितले आहे.
व्रत आरंभिले असता जसे अशौच नाही त्याचप्रमाणे दीक्षित व ऋत्विज व पूर्वी आरंभिलेले उत्सवादिक यास स्वरूपावरून आरंभावरून अवश्यकता असल्यामुळे पीडा इत्यादिक नसताही अशौच नाही, असे कित्येक ग्रंथकार म्हणतात. कन्येस ऋतुदर्शन होईल इत्यादिक संकट असता व दुसरा मुहूर्त नसता कूष्मांडहोमादि करून जननाशौचात विवाहाचा आरंभही करावा असे म्हटले आहे. विवाहिदिकात नांदीश्राद्धानंतर अशौच प्राप्त झाल्यास पूर्वी संकल्पिलेले अन्न असगोत्रीयांनी द्यावे व भक्षणही करावे. सुतकीयाने दात्यास, भोक्त्यास किंवा सिद्ध केलेल्या अन्नास स्पर्श करु नये. विवाहादि कार्यात किंवा अन्य प्रसंगी ब्राह्मण भोजन करीत असता दात्यास अशौच प्राप्त होईल तर पात्रातील अन टाकुन दुसर्याच्या घरातील उदकाने आचवले असता ब्राह्मण शुद्ध होतात इत्यादि पूर्वार्धात सांगितले आहेच. याप्रमाणे सहस्त्रभोजनादिकातही पूर्वी संकल्पित अन्नाविषयी असाच निर्णय जाणावा. पार्थिव शिवाच्या पूजेविषयी अशौच नाही. अशौचात संध्या, श्रौत, स्मार्त, होम इत्यादिकांविषयी पूर्वार्धात सांगितले आहे. अग्नि समारोप व प्रत्यवरोह हे अशौचात करू नयेत. यावरून समारोप केल्यावर अशौच प्राप्त झाल्यास पुनराधानच करावे. कारण समारोप व प्रत्यवरोह हे दुसर्याने करु नयेत; व याविषयी अशौचाचा अपवाद नाही. हे पुनराधान ऋग्वेदीयांचा १२ दिवस होमाचा लोप असता व इतर शाखीयांचा ३ दिवस होमाचा लोप असताच जाणावे. ग्रहणनिमित्तक स्नान, श्राद्ध, दान इत्यादिकांविषयी अशौच नाही. कित्येक ग्रंथकारांच्या मते स्नान मात्र करावे. स्नानदानादिकातही अशौच नाही. नित्य कर्तव्य असे स्नान, आचमन, भोजन, नियम व अस्पृश्य स्पर्शन इत्यादि नियमाविषयी अशौच नाही. वैश्वदेव, ब्रह्मयज्ञ, देवपूजा इत्यादि नित्यकर्मे व नैमित्तिक कर्म व काम्यकर्म ही अशौचात करू नयेत. भोजनकाली अशौच उत्पन्न करणारे जनन किंवा मरण ऐकिल्यास मुखातील ग्रास टाकून स्नान करावे. मुखातील ग्रास भक्षण केल्यास एक उपोषण करावे. सर्व अन्न भक्षण केल्यास त्रिरात्र उपवास करावा. याप्रमाणे कर्माने अशौच आहे किंवा नाही याचा निर्णय सांगितला.
आता द्रव्यावरून अपवाद - पुष्प, फल, मूल, लवण, मधु, मांस, शाक, तृण, काष्ठ, उदक, दूध, दही, घृत, औषध, तिल व त्याचे विकार (तेल इत्यादि), ऊस व त्याचे विकार (गूळ काकवी इ०) लाह्या, इत्यादि भाजलेले अन्न व लाडू इत्यादिक पदार्थ अशौची स्वामीचे व अशौचीयाचे घरातील ग्रहण करण्यास दोष नाही. अशौचीयाचे हातातून कोणतेही पदार्थ ग्रहण करू नयेत. पण बाजारात दुकानदार इत्यादिकास अशौच असले तरी त्यांचे हातून लवणादिक आमान्न विकत घेण्याविषयी दोष नाही. पण उदक, दही, लाह्या इत्यादिक पदार्थ त्याच्या हातून किंमत देऊनही घेऊ नयेत.
आता मृतदोषाने असणारे अपवाद - शास्त्रानुज्ञेवाचून शस्त्र, अग्नि, विष, उदक, पाषाण, भृगुपात (पर्वताचे कड्यावरून खाली उडी टाकणे), उपोषण, इत्यादिकांनी बुद्धिपूर्वक स्वेच्छेने आत्महत्या करून मरण पावलेल्यांचे अशौच नाही. मग ती आत्महत्या क्रोधाने किंवा दुसर्याच्या उद्देशाने अथवा स्वतःचे इष्टसाधन होईल अशा भ्रमाने का झाली असेना. त्याचप्रमाणे चोरी इत्यादि दोषांसाठी राजाने मारलेले, परस्त्रीलंपट झाल्यामुळे त्या स्त्रीचा पति इत्यादिकाने मारलेले व वीज पडून मेलेले यांचे अशौच नाही. दुसर्याने निषेध केला असताही गर्वाने नदीत पोहून, वृक्षावर चढून व विहीर इत्यादिकांत उतरून जो मरण पावला असेल त्याचेही अशौच नाही. गाई, इत्यादि चोरन्याकरिता किंवा गाई मारण्यास प्रवृत्त झालेला असा गाई, साप, व्याघ्रादिक नखी, वृषभादिक शृंगी, सूकरादि दंष्ट्री, हत्ती, चोर, ब्राह्मण व चांडाल इत्यादिकांनी मारला गेला तर त्याचे अशौच नाही. महापातकी, महापाप्यांचे संसर्गी, महापाप्यांचे बरोबरीचे पापी, पतित, व नपुंसक हे मरण पावले असता त्यांचे अशौच नाही. पती इत्यादिकांची हत्या करणार्या, हीनजातींशी गमन करणार्या, गर्भहत्या करणार्या, कुलता व पूर्वोक्त आत्महत्यादि पातके करणार्या अशा स्त्रिया मरण पावल्यास त्यांचे अशौच नाही. त्यांच्या प्रेतास स्पर्श करणे, रडणे, वाहणे, दहन व अंत्यकर्म ही करू नयेत. स्पर्शादिक केल्यास जाणून न जाणून अभ्यास इत्यादिकांचे तारतम्याने कृच्छ्र, अतिकृच्छ्र, सांतपन, चांद्रायण, इत्यादि प्रायःश्चित्ते निर्णयसिंधु इत्यादिग्रंथातून जाणावी. यावरून असे सिद्ध होते की, यांची प्रेते उदकात टाकावी. एक वर्षानंतर पुत्रादिकाने त्यांची आत्महत्यादिक जशी पातके असतील त्याप्रमाणे त्यांचे प्रायश्चित्त करून व नारायणबली करून पर्णशरविधीने दहनपूर्वक अशौच व अंत्यकर्म करावे. प्रेतशरीराचे दहन करून दहननिमित्तक ३ चांद्रायणे करून त्याच्या अस्थि ठेवाव्या व वर्षानंतर पूर्वोक्तरीतीने अंत्यकर्म करावे, असे काही ग्रंथकार म्हणतात.
अथवा लौकिकाग्नीने आमंत्रक दहन करून आपण (पुत्रादि अधिकारी) वाचू किंवा नाही या संशयाने किंवा भक्तीने पुत्रादिकांनी वर्षापूर्वीही त्या त्या आत्महत्यादि पातकास उक्त प्रायःश्चित्ताचे दुप्पट प्रायश्चित्तपूर्वक पर्णशरदहन किंवा अस्थिदहन करून अशौच व अंत्यकर्म करावे. हा निर्णय प्रायःश्चित्तास योग्य असणारांविषयीच आहे. प्रायश्चित्तास अयोग्य असणारांचा व घटस्फोट करुन बहिष्कृत झालेल्यांचा दासीकडून पतितोदकविधि केल्यावर त्यांचे सपिंडीविरहित और्ध्वदेहिक कर्म करावे. यावरून त्यांचे सांवत्सरिक श्राद्धही एकोद्दिष्ट विधीनेच करावे असे सिद्ध होते. अथवा आत्महत्या करून मेलेल्यांच्या पुत्रादिकांनी मृताचे जातीचे वधाविषयी उक्त असलेले ब्रह्महत्यादिकांचे प्रायःश्चित्तासह चांद्रायण व दोन तप्तकृच्छ्र असे प्रायश्चित्त करून नारायणबलिपूर्वक त्याचे दहन करावे. तसेच आत्महत्येने मरण पावलेले, गाई, हत्ती, व्याघ्र इत्यादि निमित्तक दुर्मरणाने मेलेले व पूर्वोक्त पतितादिक या सर्वांचे मरणदिवसापासून अशौच नाही तर ते ते प्रायश्चित्त व नारायणबलिपूर्वक समंत्रक दहन ज्या दिवशी होईल त्या दिवसापासूनच अशौच धरावे. उदक, अग्नि इत्यादिकाने असावधपणाने मरण पावल्यास त्यांचे अशौच मरणादिवसापासून आहे. ते त्रिरात्र आहे असे कोणी ग्रंथकार म्हणतात; १० दिवस आहे असे बहुत ग्रंथकार म्हणतात. असावधपणाने मरण हेही दुर्मरणच आहे म्हणून तन्निमितक प्रायश्चित्त पूर्वी करूनच दहनादिक करावे. ते प्रायःश्चित्त स्मृत्यर्थसारग्रंथात सांगितले आहे. ते असे चांडाल, गाई, ब्राह्मण, चोर, पशु, दंष्ट्री, सर्प, अग्नि, उदक इत्यादिकाने असावधपणाने मरण प्राप्त झाल्यास चांद्रायण व २ तप्तकृच्छ्र असे प्रायश्चित्त करून अथवा १५ कृच्छ्र प्रायश्चित्त करून यथाविधी दहन, अशौच व उदकदान इत्यादि सर्व कर्म करावेच. प्राणांतिक प्रायश्चित्ताने मरण पावलेल्याचे १० दिवस अशौच व सर्व प्रेतकार्येही करावीत. कारण, तो प्रायश्चित्ताने शुद्ध झालेला आहे. याप्रमाणे ज्याने प्रायश्चित्त आरंभिले आहे अशा मनुष्यास प्रायश्चित्तात मरण प्राप्त झाल्यास तो शुद्ध आहे, इत्यादि जाणावे.