दर्शश्राद्धी सहा प्राणायाम. महालयादि श्राद्धी व तीन वर्षानंतच्या प्रतिसांवत्सिक श्राद्धात भोजन केल्यास ६ प्राणायाम किंवा गायत्री मंत्राने दहा वेळ अभिमंत्रिक केलेले उदक प्राशन करावे. याप्रमाणे प्रायश्चित्ते न सांगितलेल्या इतर श्राद्धातही असे जलपान करावे. वृद्धिश्राद्धात भोजन केल्यास ३ प्राणायाम करावे. जातकर्मापासून चौलपर्यंत जे संस्कार त्यांच्या अंगभूत वृद्धिश्राद्धी सांतपनकृच्छ्र करावे, किंवा जातकर्मांगभूत श्राद्धी चांद्रायण करावे. इतर संस्कारांगभूत वृद्धिश्राद्धी उपवास करावा. सीमंत संस्कारात व त्या संस्काराचे अंगभूत श्राद्धात चांद्रायण करावे. आपत्काली दहा दिवसपर्यंत असलेली नवसंज्ञक श्राद्धे व एकादशाह श्राद्ध यात श्राद्धभोजन केले असता प्राजापत्यकृच्छ्र करावे. बाराव्या दिवशी असलेल्या सपिंडी श्राद्धात व ऊनमासिक श्राद्धात भोजन केल्यास पादोनकृच्छ्र करावे. द्वितीय मासिक, त्रैपक्षिक, ऊनषाण्मासिक व ऊनादिक या श्राद्धी अर्धकृच्छ्र करावे. इतर मसिके प्रथमाद्विक व वर्षांती केलेल्या सपिंडी श्राद्धी भोजन केल्यास पादकृच्छ्र किंवा उपोशण करावे. गुरूस द्रव्य देण्यासाठी श्राद्ध भोजन केल्यास सर्वत्र उक्त प्रायःश्चित्ताचे अर्ध प्रायःश्चित्त करावे. जप करणारा असेल तर त्याने चतुर्थांश करावे. आपत्काल नसता ऊनमासिकापर्यंत श्राद्धी चांद्रायण व प्राजापत्य ही दोनही करावी. द्वितीयमासिकादिक ४ श्राद्धि पादोनकृच्छ्र करावे. त्रैमासिकादिक पूर्वा सांगितली त्यात अर्धकृच्छ्र करावे. प्रथमादिक श्राद्धी पादोनकृच्छ्र व द्वितीय तृतीय या अधिक श्राद्धी एक उपोषण करावे. क्षत्रियाचे श्राद्ध असेल तर याहून दुप्पट; वैश्यश्राद्धी तिप्पट शूद्रश्राद्धी सर्वत्र चौपट प्रायःश्चित्त जाणावे. चांडाल, विष, जल, सर्प, पशू, इत्यादिकांनी मृत, पतित किंवा क्लीब, इत्यादिकांच्या नवश्राद्धी भोजन केल्यास चांद्रायण करावे. एकादशाहात श्राद्धी पराक व चांद्रायण करावे. द्वादशाहादि श्राद्धी पराक करावा. द्विमासिकादिक ४ श्राद्धी अतिकृच्छ्र करावा. इतर मासिक श्राद्धी कृच्छ्र, व आद्विक श्राद्धि पादकृच्छ्र करावे. अभ्यास असता सर्व द्विगुण करावे. आमश्राद्ध, हिरण्यश्राद्ध व सांकल्पिक श्राद्ध यांचे ठायी त्या त्या उक्त प्रायःश्चित्ताचे अर्धे प्रायश्चित्त जाणावे. यति व ब्रह्मचारी पूर्वोक्त प्रायश्चित्ते करून ३ उपवास, १०० प्राणायाम व घृतप्राशन हे अधीक करावे; आपत्ति नसता दुप्पट करावे. दर्शादि श्राद्धी संन्यासी व ब्रह्मचारी गृहस्थाश्रम्याप्रमाणेच प्रायःश्चित्त करावे. ब्रह्मचार्याने चौल संस्कारी भोजन केल्यास कृच्छ्र प्रायश्चित्त करावे. सीमंत संस्कारी चांद्रायण, अन्य संस्कारी उपवास व एकादशाह श्राद्धी भोजन केले असता चांद्रायण व पुनः संस्कार करावे, असे हेमाद्रिग्रंथात सांगितले आहे.