मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : उत्तरार्ध २|
आमान्न श्राद्ध

धर्मसिंधु - आमान्न श्राद्ध

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


काही संकटामुळे पाक करणे अशक्य असले तर जातकर्म आणि ग्रहणनिमित्तक श्राद्ध या वेळी आमश्राद्ध करावे. सपिंडी श्राद्ध, मासिक, प्रतिसांवत्सरिक, महालय, अष्टका व अन्वष्टका ही श्राद्धे आमान्नाने करू नयेत. शूद्राने दशाहापिंडादि सर्व श्राद्धे आमान्नानेच करावीत. पाकान्नाने करू नयेत. आमश्राद्धात पितरास उद्देशून 'अमुक श्राद्धं सदैव सपिंडमानेन हविषा करिष्ये' असा संकल्प करावा. बाकीचा प्रयोग पूर्वी सांगितलाच आहे. पाकप्रोक्षणस्थानी आमान्न प्रोक्षावे. आवाहनाचे काली 'उशंतस्त्वा' या मंत्रात 'हविषे अत्तवे' याऐवजी 'हविषे स्वीकर्तवे' असा उह करावा. भस्ममर्यादा घालीपर्यंत कर्म पूर्वीप्रमाणेच करावे. ब्राह्मणाच्या हातावर तांदुळांनी अग्नौकरण करावे. अन्नापेक्षा चौपट, दुप्पट किंवा सारखे ते ते आमान्न पात्रावर ठेवावे, पाणिहोम करून शेष राहिलेले पिंडासाठी ठेवून पात्रावर ठेवून 'पृथिवीते पात्रं०' इत्यादि 'इदमामं हव्यकव्यं०' इत्यादि 'इदमामममृतरूपंस्वाहा' इत्यादि यथाधर्म 'मधु' येथपर्यंत पूर्वीप्रमाणेच करावे. 'यथसुखंजुषध्वं' या वाक्याचा व आपोशन, प्राणाहुति आणि तृप्तिप्रश्न यांचा लोप करावा. संपन्नवाचन झाल्यावर अन्नशेष प्रश्नाचा लोप करावा. तांदुळांनी किंवा सातूच्या पिठाने पिंडदान करावे, असे सर्वांचे मत आहे. घरात सिद्ध केलेल्या अन्नाने किंवा पायसाने पिंड करावे, असे काही ग्रंथकार म्हणतात.

याप्रमाणे ब्राह्मणासमीप पिंडदान केल्यावर 'नमोवः पितरइषे' या उपस्थानाच्या मंत्रात 'इषे' या पदाऐवजी 'आमद्रव्याय' असा ऊह करावा. पिंडाचे विसर्जन झाल्यावर ज्या द्रव्यांचे पिंड दिले असतील त्या द्रव्यांनी विकिर द्यावे. 'स्वस्तीति ब्रूत' हे वाक्य आमश्राद्धात वर्ज करावे. 'वाजेवाजे' या मंत्रात 'तृप्तायात' याऐवजी 'तृप्स्यथ यत' असा ऊह करावा. नंतर पूर्वी सांगितल्याप्रमाणे शेषकर्म संपूर्ण करावे. ब्राह्मणांनी आमश्राद्ध पूर्वाह्णी करावे; शूद्रांनी ते अपराह्णीच करावे. आमान्नाचा अभाव असेल तर हिरण्यश्राद्धही असेच करावे. संकल्प करिताना सर्वत्र 'आम' पदाऐवजी 'हिरण्य' पदाची योजना करावी.

हिरण्याचे प्रोक्षण आमान्नाप्रमाणेच करावे. 'अत्तव' इत्यादि तीन मंत्राचा ऊहही पूर्वीसारखाच करावा. तांदूळ इत्यादिकांनी हस्तावर अग्नौकरण करावे. अन्नापेक्षा हिरण्य आठपट, चौपट, दुप्पट किंवा सारखे द्यावे, हिरण्यश्राद्धी दक्षिणा हेच श्राद्धासंबंधी आमान्न किंवा हिरण्य द्विजाने दिले असेल तर त्याची यथेष्ट योजना करावी. शूद्राने दिलेले असेल तर भोजनाव्यतिरिक्त कृत्यांकडे त्याची योजना करावी. श्राद्धसंबंधी आमान्नाने पंचमहायज्ञ व श्राद्ध ही करु नयेत. हिरण्यश्रद्ध व आमान्नश्राद्ध यात पिंडदान वैकल्पिक असल्याने सांकल्पिक विधीनेही ही दोन्ही करावी.

सांकल्पिक विधीचे ठायी समंत्रक आवाहन, अदर्घ्य, अग्नौकरण, पिंडदान, विकिर, अक्षय्य व स्वधावाचन प्रश्न हे प्रकार वर्ज्य होत. सांकल्पिक विधि असता

'अमुक श्राद्धमामेनहविषा हिरण्यनवा सांकल्पिक विधिना करिष्ये'

असा संकल्प करावा. शूद्राचे घरी दुसर्‍याने दिलेले दूध इत्यादिकही भक्षण करू नये; मग त्या शूद्राने दिलेल्या आमान्नादिकाचा त्याचे घरी पाक करुन भक्षण करू नये, हे सांगावयास पाहिजे काय? म्हणून शूद्रापासून मिळालेले आमान्न ब्राह्मणाचे घरी पाक करून भक्षण करावे, असे सिद्ध होते. याप्रमाणे आमश्राद्ध व हेमश्राद्ध यांचा विधि सांगितला.

N/A

References : N/A
Last Updated : March 02, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP