वुद्धिश्राद्ध, सपिंडी, प्रेतश्राद्ध, अनुमासिक व संवत्सर विमोक श्राद्धात तिलतर्पण करू नये. त्यामध्ये तर्पणाचा प्रकार - दुसर्या दिवशी तर्पण कर्तव्य असल्यास स्नान करून तरण केल्यावर नित्यस्नान व प्रातःसंध्या करावी. अथवा नित्यस्नान व प्रातःसंध्या केल्यावर श्राद्धांग तर्पण करावे. ते असे- संबंध, नाम, गोत्र व रूप हे द्वितीया विभक्तीत उच्चारून 'स्वधानमस्तर्पयामि' असे म्हणून ऋग्वेदी यांनी उजव्या हाताने व इतर शाखीयांनी अंजुळीने ३-३ वेळ तर्पण करावे. प्रत्येक अंजुळीस मंत्राची आवृत्ति करावी. नित्य तर्पणाविषयीही असाच निर्णय जाणावा.
यानंतर ब्रह्मयज्ञांगभूत नित्य तर्पणात तिलयुक्त तर्पणाचे निषेधाचा काल सांगतो- रविवार, भौमवार, भृगुवार, प्रतिपदा, षष्ठी, एकादशी, सप्तमी, त्रयोदशी, भरणी, कृत्तिका, मघा, रात्री, संधिकाळ, गृह, जन्मनक्षत्र, शुभ कार्याचा दिवस, शुभ कार्ययुक्त परकीयगृह, मन्वादि तिथि, युगादि तिथि, गजछाया व दोन अयन दिवस या काली तिलतर्पण, मृत्तिकास्नान व पिंडदान ही करू नयेत. २ अयनदिवस, युगादि व मन्वादिक या दिवशी तिलतर्पण केल्यास दोष नाही, असे काही ग्रंथकार म्हणतात. विवाह, मौजी व चौल ही झाली असता क्रमाने १ वर्ष, ६ मास व ३ मास व इतरसंस्कारी १ किम्वा अर्धमासपर्यंत महालय, गयाश्राद्ध व क्षयदिवस श्राद्ध, याशिवाय तिलतर्पणादिक करु नये असे म्हटले आहे. या निषिद्ध दिनी अथवा तिलांचा अभाव असता सुवर्ण व रौप्ययुक्त हस्ताने किंवा दर्भयुक्त हस्ताने नित्यतर्पण करावे.