शय्यामरण, शौचहीन व संस्कारहीन मरण, कीटक, मोडशी, घशांत घास अडकणें, खोकला, अतिसार व शाकिनी, इत्यादि ग्रहांची पीडा यांनी आलेलें मरण, अंतरिक्ष मरण व अस्पृश्यस्पर्श मरण, हीं असतां दानादि विधीच करावा. प्रायश्चित्त करुं नये. नारायणबलि करुं नये किंवा वर्षादि कालाची प्रतीक्षाही करुं नये. व्याघ्रादि, विष, उदक व शस्त्रादिक या कारणांनी आलेलें मरण, असावधपणानें, गर्वादिकानें व बुद्धिपूर्वक असें अनेक प्रकारांनीं संभवतें त्यांत पूर्वोक्त व्यवस्थेनें प्रायश्चित्त, नारायणबलि व दानादि विधि याप्रमाणें तीन करावी. पित्याचें उदकादि दुर्मरणाचें प्रायश्चित्त किंवा ब्रह्महत्यादि पापाचें प्रायश्चित्त किंवा आत्महत्येचें प्रायश्चित्त करण्यास जर पुत्र समर्थ नसेल तर पूर्वोक्त दानादि विधि व नारायणबलि ही २ करुन व अत्यंत असामर्थ्य असेल तर फक्त नारायणबलि करुन त्यानें अंत्यकर्म करावें. कारण तेवढें केल्यानें पुत्रादि सर्पिडांचे शुद्धीची सिद्धि होते. पुत्रादिकांनीं तें तें प्रायश्चित केल्यास पिता इत्यादिकांस नरकादि भोग प्राप्त होईलच, असें जाणावें.