आहिताग्नि, पतित इत्यादिकांस मरण प्राप्त झाल्यास व गर्वादिकांच्या योगानें चांडाळ, शृंगयुक्त पशु, चोर इत्यादि कारणानें मरण आल्यास विशेषः -- साग्निक पापकर्मी झाल्यास दक्षिणाग्नि, गार्हपत्य व आहवनीय हे तीन अग्नि उदकांत टाकावे. गृह्याग्नि चवाठ्यावर टाकावा, व पात्रें तर अग्नींत दहन करावीत. नंतर प्रायश्चित्त, योग्यता, अयोग्यता इत्यादि पूर्वी सांगितलेल्या व्यवस्थेनें मंथनानें उत्पन्न केलेल्या अग्नीनें दहन इत्यादि अंत्यकर्म करावें. महापातकयुक्त साग्निक जिवंत असेल तर तो प्रायश्चित्त घेईपर्यंत पुत्रादिकानें त्याचे अग्नि भक्षण करावे. जो प्रायश्चित्त घेणार नाहीं किंवा प्रायश्चित्त घेत असतां मरण पावेल त्याचे अग्नि जलांत टाकावे. पात्रें अग्नींत किंवा जलांत टाकावी. दुर्मरण व आत्महत्या यांनी आहिताग्नि मरण पावल्यास त्याचें लौलिकाग्नीनें अमंत्रक दहन करुन त्याच्या अस्थि दुग्धानें प्रक्षालन करुन त्याचें प्रायश्चित्त केल्यावर श्रौताग्नीनें समंत्रक दहनादि करावें, असें माधवाच्या ग्रंथांत सांगितलें आहे. निराग्निकांस दुर्मरण प्राप्त झाल्यासही हा निर्णय योजावा.