आता ब्राह्मणास वमन झाले असता कर्तव्यविधि सांगतो - पिता इत्यादिक ब्राह्मणास लौकिक अग्नि स्थापन करून आज्यभागापर्यंत चरूच्या निर्वापाने कर्म करून नामगोत्रपूर्वक अग्नीत पितरांचे आवाहन करावे. विश्वेदेवाकडच्या ब्राह्मणास वांति झाली असेल तर देवाचे आवाहन करावे. नंतर पूजा करून देवतोद्देशाने अन्नत्याग करून 'प्राणायस्वाहा' इत्यादि मंत्रांनी ३२ आहुतींनी हवन करावे किंवा पुनः श्राद्ध करावे. असे दोन पक्ष आहेत. दोन्हीपक्षी 'इंद्रायसाम' या सूक्ताचा जप नित्य आहे. आता दोन पक्षांची व्यवस्था सांगतो. वैश्वदेवाकडच्या ब्राह्मणास वांति झाली असता होमच करावा. पुनः श्राद्ध करू नये. पितराकडच्या ब्राह्मणास पिंडदानानंतर वांति झाली असता होमच करावा, पुनः श्राद्ध करू नये;. पिंडदानापूर्वी पितरांकडच्या ब्राह्मणास वांति झाल्यास त्या दिवशी उपवास करून दुसर्या दिवशी पुनः श्राद्ध करावे. हा निर्णय सपिंडीकर, महैकोद्दिष्ट, मासिक, आब्दिक व प्रतिसांवत्सरिक श्राद्धाविषयीच जाणावा. दर्शादिक श्राद्धी वांति झाल्यास त्याच दिवशी आमाने श्राद्ध करावे. अष्टका, अन्वष्टका व पूर्वेद्युः श्राद्ध याविषयीही असाच निर्णय जाणावा. त्यातही साग्निक ऋग्वेदी यास आमश्राद्धात व्यतिषंगादि व्यथोक्त प्रयोगाचा असंभव असल्याने सांकल्पिक विधीने दर्श, अष्टका, अन्वष्टका, पूर्वेद्युः श्राद्ध ही आमाने करावी किंवा त्या त्या श्राद्धलोपाचे प्रायश्चित्त निबंधात सांगितलेले करावे, असे वाटते. वृद्धिश्राद्ध, पिंडरहित संक्रात्यादि श्राद्ध व नित्यश्राद्ध यात वांति झाली असता आवृत्तिच करावी. तीर्थश्राद्ध असेल तर दर्शाप्रमाणे आमान्नानेच करावे. महालयश्राद्धी पार्वणस्थानीच्या ब्राह्मणास वांति झाल्यास श्राद्धाची पुनरावृत्ति करावी. एकोद्दिष्ट स्थानीच्या ब्राह्मणास वांति झाल्यास होमच करावा, असे वाटते. देवाकडच्या ब्राह्मणास वांति झाल्यास सर्व श्राद्धात होमच करावा, असे पूर्वी सांगितलेच आहे. होमपक्षी व पुनः श्राद्ध करावे या पक्षी सर्वत्र सूक्ताचा जप नित्य आहे, असेही सांगितले आहे.