' अद्येत्याद्यमुकस्य सुखेनप्रानोत्क्रमण प्रतिबंधक सकल पापक्षयद्वारा सुखेन प्राणोत्क्रमणाय यथाशक्तिलंकृतामिमामुत्क्रांति धेनुं रुद्रदैवत्या ममुकशर्मणेतुभ्यं संप्रददे । गवामंगेषु० ' हा मंत्र म्हटल्यावर ' नमम ' असें म्हणावें. गाय न मिळाल्यास द्रव्य द्यावें.
प्रायश्चित्तापासून दानापर्यत पूर्वी सांगितलेला विधि केल्याशिवाय पित्नादिकांस मरण प्राप्त झाल्यास पुत्रादिकानें प्रायश्चित्त करुन दहनादिक करावें; व दानें करणें तीं ११ व्या दिवशीं करावी. पित्याचें पापाचरण नाहीं असा निश्चय असल्यास प्रायश्चित्त आवश्यक नाहीं. उत्क्रांति धेनु, वैतरणी धेनु व दशदानें हीं मृत झाल्यावरही करुन त्या प्रेताचें दहन करावें, असें कांही ग्रंथकार म्हणतात. मरणसमयीं तुळसी व शाळिग्रामशिळा जवळ ठेवावी. कित्येक ग्रंथकार तीळ, लोखंड, सुवर्ण, कापूस, लवण, भूमि, धेनु व सप्त धान्यें, याप्रमाणें ८ दानें सांगतात. मुमुक्षूनें मधुपर्क दान करावें, असेंही क्कचित् ग्रंथांत म्हटलें आहे.
पुत्रादि कर्त्यानें अंत्यकर्माचा अधिकार प्राप्त होण्यास ३ कृच्छ्र इत्यादिक प्रायश्चित्त व वपन करावें. त्यांत माता, पिता, सापन्त माता, पितृव्य, ज्येष्ठभ्राता इत्यादिकांचें अंत्यकर्म करणें असल्यास क्षौर आवश्यक आहे. कर्त्याशिवाय अन्य पुत्रांसही क्षौर नित्य आहे. याप्रमाणें स्त्रीसही प्रथम दिवशीं अथवा १० व्या दिवशीं क्षौर नित्य आहे. तसेंच दत्तकास पूर्वीचे व पुढचे मातापितर मृत असतां क्षौर आहे. रात्र असेल तर दहन करुन वपनावांचून पिंडांत क्रिया करावी. रात्नीं वपन करुं नये, दुसर्या दिवशीं वपन करावें. पत्नी, पुत्र, कनिष्ठ भ्राता, इत्यादिकांचें अंत्यकर्म करणें असल्यास क्षौर नाहीं. इतरत्र कृताकृत आहे.
स्मशानांत नेले जाणारे शवास शूद्रस्पर्श झाल्यास किंवा शूद्रानें खांदा दिल्यास कुंभांत उदक व पंचगव्य घालून तें सुमंत्रांनी अभिमंत्रित करुन त्यानें स्नान घालून दहन करावें; व ३ कृच्छ्र प्रायश्चित्त करावें. बाळंतीण व रजस्वला यांचा स्पर्श झाल्यासही असाच निर्णय जाणावा. प्रायश्चित्त १५ कृच्छ्र करावें. शूद्रानें द्विजाचें वहन केल्यास चांद्रायण, पराक, प्राजापत्य हीं एकामागून एक प्रायश्चित्तें पुत्रादिकानें करुन त्याच्या अस्थींचें पुनः दहन करावें. अस्थि न मिळाल्यास पालाशविधि करावा. उध्वोच्छिष्ट, अधरोच्छिष्ट व उभयोच्छिष्ट हीं असतां ३ कृच्छ्र, अस्पृश्याचा स्पर्श झाल्यास ६ कृच्छ्रें; अंतराल मरण असल्यास ९ कृच्छ्रें, बाजेवर मरण आल्यास १२ कृच्छ्रें, तुरुंगांत मरण आल्यास १५ कृच्छ्रें; रजकादि ( रजक, चर्मकार, नट, बुरुड, कैवर्त, मेद व भिल्ल ) सात प्रकारच्या अंत्यजादिकांचा स्पर्श होऊन मरण आल्यास ३१ कृच्छ्रें; व देशांतरी मरण आल्यास २ पराक, किंवा ८ कृच्छ्रें प्रायश्चित्त करावें. अशौचांत मरण आल्यास ३ कृच्छ्र करावें. शव अर्धे दग्ध झाल्यावर चितेस अस्पृश्य स्पर्श झाल्यास ३ कृच्छ्र करावें. याप्रमाणें पुत्रादिकांनीं पिता इत्यादिक पाप्याचें जसें पाप असेल त्याप्रमाणें प्रायश्चित्तकांडांत सांगितलेलें प्रायश्चित्त; दुर्मरण, आत्महत्या इत्यादि निमित्त असल्यास पूर्वोक्त प्रायश्चित्त व नारायणबलि इत्यादि करुन अंत्यकर्म करावें. याप्रमाणें उक्त प्रायश्चित्त केल्याशिवाय दहनादिक केल्यास तें कर्म व्यर्थ होईल व दोघांसही नरक प्राप्त होईल.
पति व स्त्री यांचें दहन एकाच कालीं प्राप्त झाल्यास पतीसहवर्तमान स्त्रियेचा द्विवचनान्त मंत्राचे ऊहानें दहन करुन पिंडादिक कर्म पतिपूर्वक निराळें करावें. याप्रमाणें बहुत सवती एकाकालीं मृत झाल्यास त्यांचें दहन बरोबरच करावें. पिंडादिक कर्म ज्येष्ठ क्रमानें निरनिराळेंच करावें. याप्रमाणें लौकिकाग्नीनें दहन करण्यास योग्य असे पिता व पुत्न किंवा २ भ्राते यांचें दहन बरोबरच करुन पिंडादिक कर्म पितृपूर्वक व ज्येष्ठपूर्वक निराळें करावें. पुरुषबालकें व स्त्रीबालकें यांचें दहन व खनन असतांही असाच निर्णय जाणावा. असें नागोजीभट्टकृत ग्रंथांत म्हटलें आहे. रजस्वला, गर्भिणी इत्यादिकांचें मरण, सहगमन यांविषयी पुढें सांगण्यांत येईल.
नंतर गोमयानें सारवलेल्या भूमीवर दर्भ घालून त्या दर्भीवर बसून किंवा दक्षिण दिशेस शिर करुन निजून गोपिचंदनादि मृत्तिकेचा तिलक लावून श्रीविष्णूचें स्मरण करीत असतां पुण्यसूक्त, गीता, सहस्त्रनामादि स्तात्रें पठण करावीं किंवा श्रवण करावीं. '' अमृतत्वप्राप्त्यर्थेपुण्यसूक्त स्तोत्रादीनां पाठं श्रवणंवाकरिष्ये '' असा संकल्प करावा. श्रवण करणारांस संकल्प करण्याचें सामर्थ्य नसेल तर श्रवण करविणारानें '' अस्यामुक शर्मणोऽमृतत्वप्राप्तयेऽमुकंश्रावयिष्ये '' असा संकल्प करावा. '' नानानं० '' हें सूक्त, पुरुषसूक्त, विष्णुसूक्त व उपनिषद्भाग इत्यादिक पुण्यसूक्तें होत. रामकृष्ण इत्यादि नामस्मरणास सर्व जातिमात्रांस अधिकार आहे.