इष्ट सिद्धीकरिता श्रीविठ्ठल व रुक्मिणी यांचे ध्यान करून व दीन दयाळू अशा मातापितरांस नमस्कार करून अशौचनिर्णय सांगतो
त्यात प्रथम गर्भाचा नाश व जनन इत्यादि अशौच सांगतो - ४ महिन्यापर्यंत जो गर्भनाश तो स्त्राव होय व पाचव्या, सहाव्या मासातील जो गर्भनाश तो पात होय. सातव्या मासापासून प्रसूति होय. त्याविषयी अशौचाचे विवेचन करितो - गर्भस्त्राव असता पहिल्या ३ मासात मातेस त्रिरात्र; चौथ्या मासात ४ रात्री. अस्पृश्यत्वरूप अशौच स्त्राव झाल्यास पिता इत्यादि सर्व सपिंडाची स्नानाने शुद्धि होते. ५ व्या व ६ व्या मासात गर्भपात झाल्यास गर्भिणीस मासतुल्य क्रमाने ५।६ दिवसपर्यंत अस्पृश्यत्व लक्षण अशौच जाणावे, पिता इत्यादि सपिंडास ३ दिवस जननाशौच; मृताशौच नाही. स्त्राव व पात यांचे अशौच सर्व साधारण आहे. गर्भिणीचा प्रसव ७ व्या महिन्यापासून झाल्यास माता व पिता इत्यादि सपिंडास संपूर्ण जननाशौच आहे, हे जननाशौच (सुव्हेर) ब्राह्मणास १० दिवस, क्षत्रियास १२ दिवस, वैश्यास १५ दिवस, शूद्रास १ मास व संकर जातीस शुद्राप्रमाणे अशौच आहे. विज्ञानेश्वराचे मत तर असे आहे की, संकर जातीस अशौच नाही. स्नान मात्र आहे. अथवा सर्व वर्णास १० दिवस अशौच आहे. जननाशौचात गर्भिणीस १० दिवस अस्पृश्यत्व जाणवे. कन्या झाल्यास १ मासपर्यंत व पुत्र झाल्यास २० रात्रीपर्यंत ती कर्मानधिकारी आहे. हा निर्णय अशौचनिवृतीनंतरचा जाणावा. ब्राह्मण स्त्रियेस क्रमाने ४०।३० दिवसपर्यंत अधिकार नाही. कन्या किंवा पुत्र उत्पन्न झाल्यावर पिता व सापत्न माता यास सचैल स्नानापुर्वी अस्पृश्यत्व आहे. जननाशौच असता पिता इत्यादि सपिंडास कर्माधिकार मात्र नाही. कर्मादिकालाहून अन्यकाली स्पर्श झाल्यास दुसर्यास दोष नाही. नालच्छेदनापूर्वी जातकर्म व दान याविषयी पित्यास अधिकार आहे. याप्रमाणे पाचवा, सहावा व दहावा या दिवशी दान व जन्मादि देवतांचे पूजन याविषयी अधिकार आहे. त्या दिवशी ब्राह्मणांस प्रतिगृहाविषयी दोष नाही.
मूळपुरुषापासुन आरंभ करुन सातव्या पुरुषापर्यंत ते सपिंड होत. ८ व्या पुरुषापासून ७पुरुष समानोदक होत. १५ पासून ७ पुरुषपर्यंत म्हणजे २१ पुरुषपर्यंत ते सगोत्र होत. त्यात सपिंडास १० दिवस, सोदकांस त्रिरात्र व सगोत्रास १ रात्र अशौच आहे, असे नागोजीभट्ट कृत अशौचनिर्णयात सांगितले आहे. दुसर्या ग्रंथकाराचे मते सगोत्रास अशौच नाही. सपिंड व सोदक इत्यादिकांचा अशौच विभाग जननाशौच व मरणाशौच याविषयी समान आहे. मरणाशौचाविषय़ी तर अशौचाचा विच्छेद झाला असला म्हणजे पिढ्या तुटल्यामुळे अशौच धरणे नसले तरी जोपर्यंत एका कुलाचे ज्ञान आहे तोपर्यंत स्नान आहेच; हा विशेष जाणावा. येथे इतके जाणणे अवश्य आहे; ते हे की, मूळपुरुषापासून आरंभ करून संततिभेद असता एका संततीचे ठायी कोणी एक पुरुष आठवा व दुसर्या संततीचे ठायी कोणी एक ७वा असे असेल तर त्यांची एकीकडून सापिंड्याची अनुवृत्ति होते व दुसरीकडे निवृत्ति होते असे सांगितले आहे. त्यापैकी, सापिंड्यातून निवृत्त झालेल्या आठव्या पुरुषाने दुसर्या संततीतील सप्तमादिकांचे जनन व मरण झाले असता ३ दिवस अशौच धरावे. अनुवृत्त सापिंड्य असलेल्या सातव्याने ८ वा इत्यादिकांचे जननमरण झाले असता १० दिवस अशौच धरावे. याप्रमाणे सोदक त्रिरात्रादिकांविषयी व कन्यविषयक त्रिपुरुष सापिंड्याविषयीही असाच निर्णय जाणावा. ८ वा मृतपितृक किंवा जीवत्पितृक असेल तर त्याने ३ दिवसच अशौच धरावे. कारण त्र्यंबकभट्टकृत त्र्यंबकित, भट्टोजीदिक्षितकृत व नागोजी भट्टकृत अशौचप्रकरणात व इतर ग्रंथातही पित्रादिक जिवंत किंवा मृत असल्याविषयीचा विशेष कोठे आढळत नाही, असे काही ग्रंथकार म्हणतात. दुसरे ग्रंथकार तर निर्णयसिंधूत सापिंड्यप्रकरणी 'दहाव्या पुरुषापासून धर्म विच्छित्ती' इत्यादि सुमंतूच्या वाक्यावर शूलपाणीने केलेल्या व्याख्यानात एक पिंडदान क्रियान्वयित्वरूप म्हणजे एक पिंडदान क्रियेचा संबंध ज्यास आहे असे सापिंड्यलक्षण स्वीकारून ज्याचे पितामह व प्रपितामह जिवंत आहेत त्याचे प्रपितामहापलीकडचे तीन पिंडभाक होत. पिंडभाक जे त्यापासून ३ नऊ पुरुषांपर्यंत लेपभाग होत, व श्राद्धकर्ता दहावा याप्रमाणे दहाव्या पुरुषानंतर सापिंड्य निवृत्ति होते. पिता व पितामह जिवंत असल्यास ९ पुरुषांपर्यंत सापिंड्य व पिता जिवंत असल्यास ८ पुरुषांपर्यंत सापिंड्य असे प्रतिपादिले आहे. म्हणून ८ व्या इत्यादिकाचा पिता इत्यादिक जिवंत असेल तर त्या आठव्यास १० दिवसपर्यंत अशौच. पिता इत्यादि मृत झाल्यावरच ३ दिवस अशौच, असे म्हणतात. याविषयी मला दुसरा पक्षच योग्य वाटतो.
पित्याचे घरी कन्या प्रसूत झाल्यास मातापितरास व त्या घरी असणारे भ्रात्यांस १ दिवस जननाशौच. पित्याचे घरी राहणारे पितृव्यादिक पित्याचे सर्व सपिंडास १ दिवस, असे स्मृत्त्यर्थसारात म्हटले आहे. याप्रमाणे भ्राता इत्यादिकांचे घरी भगिनी प्रसूत झाल्यास भ्रात्यास १ दिवस जननाशौच. माधवाचे मते पित्याचे घरी कन्या प्रसूत झाल्यास मातापितरांस त्रिरात्र जननाशौच व त्या घरी राहणार्या भ्रात्यास १ दिवस जननाशौच. पतीच्या गृही कन्या प्रसूत झाल्यास पित्रादिकांस अशौच नाही. शिशु मृत होऊन उत्पन्न झाल्यास सपिंडास संपूर्णच जननाशौच आहे, मृताशौच नाही. जन्मानंतर नालच्छेदन करण्यापूर्वी शिशू मृत झाल्यास पिता इत्यादि सपिंडास ३ दिवस जननाशौच. मातेस १० दिवसच जननाशौच. मृताशौच नाही. नालच्छेदन झाल्यावर १० दिवसांच्या आत शिशू मृत झाल्यास सपिंडादिकांस संपूर्ण जननाशौच; मृताशौच नाही.