गावात जोपर्यंत प्रेत असेल तोपर्यंत गावास अशौच आहे. पण नगरास अशौच नाही. गाव व नगर यांची लक्षणे दुसर्या ग्रंथात पहावी. गाई, इत्यादि पशु मरण पावले असता जोपर्यंत त्या पशूचे प्रेत घरात राहील तोपर्यंत गृहस्थास अशौच. ब्राह्मणाच्या घरी कुत्रा मरण पावल्यास घरास १० रात्री अशौच. शूद्र मृत झाल्यास १ मास; पतित मृत झाल्यास २ मास व म्लेछादिक मृत झाल्यास ४ मास अशौच आहे. घरी झालेला, विकत घेतलेला, कर्जातून सोडविलेला, मिळलेला, इत्यादि प्रकारचे जे दास त्यांनी स्वामी मृत असता सजातीय अशौच धरावे. युद्धात शस्त्रप्रहाराने तात्काल मृत झाल्यास स्नान मात्र करावे, अशौच नाही. त्याचे दशाहादि अंत्यकर्मही तत्कालीच करावे. युद्धसंबंधी क्षताने कालांतराने मृत झाल्यास एक दिवस अशौच. युद्धसंबंधी कपटाने मारला गेल्यास त्रिरात्र अशौच. युद्धाच्या क्षताने ७ रात्रीनंतर मरण पावल्यास १० दिवस अशौच असे म्हणतात. काही शिष्ट युद्धात मृत झालेल्याची सद्यःशुद्धि लोक विद्विष्टत्वामुळे सांगत नाहीत. प्रयागादि क्षेत्री कामनिक मरण आल्यास फक्त स्नान करावे. प्रायःश्चितार्थ अग्नि इत्यादिकांनी मरण प्राप्त झाल्यास १ दिवस अशौच. महारोगादि पीडा सहन करण्यास असमर्थ होऊन उदकादिकात प्रवेश करून मरण पावल्यास त्रिरात्र अशौच. याविषयीही शिष्टाचाराची संमति नाही. याप्रमाणे तुरुंगात मृत झालेल्याचे जे एक रात्र अशौच, त्याविषयीही शिष्टाचार संमति नाही.