त्यात मातापितरांचा मृत दिवस एक असेल तर पूर्वी पित्याचे श्राद्ध व नंतर निराळा पाक करून मातेचे श्राद्ध करावे. असे पूर्वी सांगितलेच आहे. घराचे दहन, इत्यादि कारणाने सपिंडास एकाच काली मरण आल्यास, संबंधाच्या जवळच्या क्रमाने निरनिराआ पाक करून श्राद्धे करावी. निरनिराळा पाक करून निरनिराळी श्राद्धे करण्यास शक्ति नसेल तर एक तंत्राने पाक करून श्राद्धे निरनिराळी करावी. क्रमाने एक दिवशी मरण आल्यास मरणाच्या क्रमानेच श्राद्धे करावी, एका दिवशी एकाने तिघांची श्राद्धे करू नयेत. तीन वार्षिक श्राद्धे एका दिवशी प्राप्त झाल्यावर २ श्राद्धे स्वतः करावी व तिसरे भ्राता इत्यादिकांकडून करवावे किंवा दुसर्या दिवशी स्वतः करावे. मातापितरांचे व सपिंडाचे श्राद्ध एकाच दिवशी आल्यास त्याविषयी पूर्वी सांगितलेच आहे. ज्याचे श्राद्ध एकदा केले त्याचे श्राद्ध पुनः त्या दिवशी करू नये. नैमित्तिक असल्यास करावे; कारण निमित्ताच्या उत्पत्तीचा अनुक्रम आहे. षण्णवति श्राद्धात समान देवता असल्यास एकतंत्राने श्राद्धे करावी. अधिक देवता असल्यास निरनिराळी करावी. वार्षिक, मासिक व उदकुंभ ही श्राद्धे असता नित्यश्राद्ध व दर्शादिक श्राद्ध ही निराळी करावी. कारण त्यांच्या देवता भिन्न आहेत. महालय, तीर्थश्राद्ध व दर्शादि षण्णवति श्राद्धे ही असता नित्यश्राद्धाची प्रसंगसिद्धी होते. मासिक श्राद्धाने उदकुंभ श्राद्धाची प्रसंगसिद्धी होते. प्रसंग सिद्धिस्थळी दर्शादिप्रसंगी श्राद्ध निश्चयाने संकल्पपूर्वक सांग करावे. नित्यादिक संकल्पादिकात प्रसंग सिद्ध उच्चारू नये. असा लोपाचा जो दुसरा पर्याय त्यालाच प्रसंगसिद्धि असे म्हणतात. तंत्रसिद्धीविषयी २ प्रकार दिसतात. दर्श श्राद्ध व व्यतिपात श्राद्ध एकतंत्राने कर्तव्य असता ६ पुरुषांचा उद्देश करून 'दर्शश्राद्धं व्यतिपात श्राद्धंच तंत्रेण करिष्ये' असा संकल्प केल्यावर 'दर्शपात श्राद्धैवह देवार्थ क्षणः करणीयः' असे म्हणून देव ब्राह्मणास निमंत्रण करून 'दर्श पातश्राद्धैवह पित्राद्यर्थे क्षणः करणीय' याप्रमाणे २ त्रयीसाठी २ इत्यादि ब्राह्मणास एकच श्राद्ध करावे. असा एक प्रकार, अथवा पुर्वीप्रमाणेच संकल्प करून देवाकडे एक तंत्राने एकाच ब्राह्मणास निमंत्रण करून षोडश मासिक श्राद्धाच्या तंत्राप्रमाणे 'दर्शश्राद्धे क्षणः करणीय' असे दर्शाच्या ब्राह्मणाचे निमंत्रण केल्यावर 'व्यतीपात श्राद्धे क्षणः० असे दुसर्या ब्राह्मणास निमंत्रण करून ४ इत्यादि ब्राह्मणांनी युक्त सहा अर्घ्यांनी युक्त सपिंडश्राद्ध एकाच पाकाने करावे. कारण व्यतीपात श्राद्धात पिंडदान नाही, हा दुसरा प्रकार. याप्रमाणे ३।४ इत्यादि श्राद्धांचे तंत्राविषयी असाच प्रकार जाणावा. या दोन्ही पक्षापैकी, विचारांती जो योग्य वाटेल तो विद्वानांनी ग्रहण करावा.
मयूखात असे सांगितले आहे की, सपिंडक दर्शश्राद्धाने अपिंडक एक देवताक व व्यतिपातादि श्राद्धांची प्रसंगसिद्धि होते. तंत्र सिद्धि नाही. तंत्राचे उदाहरण व्यतिपात, संक्रांती, इत्यादिक सांगितले आहे. अन्वष्टक्य श्राद्धाने पित्याचे व मातेचे वार्षिक व मासिक श्राद्धांची प्रसंग सिद्धि होते असे सांगितले ते महालयश्राद्धाने वार्षिकाची सिद्धि मानल्यामुळे बहुतेक ग्रंथांशी विरुद्ध होते. देवताभिन्नत्वामुळे दर्श व वार्षिक श्राद्ध यात श्राद्धभेद होतो. तेथे निमित्ताचा अनियम असल्याने येथे पूर्वानुष्ठानाचे कारण आहे असे वाक्य आहे. म्हणून पूर्वी वर्षश्राद्ध करून नंतर दर्शश्राद्ध करावे. सर्वास एकोरूपाने एका काली प्राप्त न होणारे ते अनियमित अनिमित्तक वार्षिक श्राद्ध पूर्वी करावे, असा वाक्यार्थ आहे. वार्षिक व मासिक इत्यादिक एक दिवशी प्राप्त झाल्यास पितृपूर्वकत्व व संबंध सामी इत्यादिक असे सांगितलेच आहे. दर्श व महालय ही एके दिवशी प्राप्त झाल्यास पूर्वा महालयश्राद्ध व नंतर दर्शकश्राद्ध करावे. दर्शदिवशी वार्षिक व महालय प्राप्त झाल्यास पूर्वी वार्षिक, नंतर महालय व नंतर दर्श अशी तीन श्राद्धे निरनिराळ्या पाकाने करावीत. याचा विस्तार महालय प्रकरणात केला आहे. तसेच काम्य तंत्राने नित्य श्राद्धाचे तंत्र सिद्धि पावते.
नंतर संक्रांति, २ अयने, २ विषुव, युगादि मन्वादि, भाद्रपद कृष्ण १३, शोश्रियाचे आगमन निमित्तक, मघायुक्त त्रयोदशी, वैधृति, व्यतिपात, ग्रहण, पुत्रजन निमित्तक, अलभ्ययोग निमित्तक ही श्राद्धे व प्रौष्ठपदी व्यतिरिक्त सर्व पौर्णमासी श्राद्धे पिंडरहित व संकल्पविधीने करावीत. या श्राद्धात दर्शाप्रमाणे ६ पुरुषांचा उच्चार करावा. यावरून ही एककाली प्राप्त झाली असता तंत्राने सिद्धि होते. नित्यश्राद्धाची प्रसंगसिद्धि करावी. ग्रहणश्राद्ध भिन्नकाली असता पृथक करावे. ग्रहणश्राद्धाने संक्रांति, दर्श, इत्यादि श्राद्धांची प्रसंगसिद्धि होते, असे प्रथम परिच्छेदात दुसरे मत सांगितले आहे. पुत्रजन्मनिमित्तक श्राद्धाच्या देवता ९ आहेत. म्हणून ते निराळे व हिरण्यानेच करावे; आमान्नाने किंवा अन्नाने करू नये. याप्रमाणे श्राद्ध संपाताचा निर्णय सांगितला.