आता पाणिहोमाचा प्रकार सांगतो - पाणिहोमामध्ये 'विप्रपाणावग्नौकरणं' 'क्रियताम' असे अनुमोदन 'करिष्ये' असा प्रश्न असता 'कुरुष्व' अशी अनुज्ञा होत नाही असे सर्वत्र आश्वलायनाचे मत आहे. कात्यायन इत्यादिकांचे तर असेच मत आहे. आश्वलायन सूत्राचे वृत्तीत तर पाणिहोमाचे ठायी कसाही प्रश्न व प्रतिवचन करु नये, असे प्रकाशित केले आहे.
पितरांकडचे ब्राह्मणांचा दर्भसहित हस्त सव्याने परिसमूहन करून व पर्युक्षण करून प्रेक्षणाने किंवा हस्ताने पूर्वीप्रमाणे 'सोमाय' इत्यादि दोन मंत्रांनी प्राचीनावीतीनेच दोन आहुति हवन कराव्यात. त्यात हस्ताने होम करण्याचा पक्ष असल्यास डाव्या हाताने दर्भाने उजव्या हातास घृत लावून उजव्या हाताने दोन वेळ चरु घेऊन डाव्या हाताने अभिघार करून चतुरवत्तिस्व इत्यादिक करावे. ऋग्वेदीयांनी सर्व पितरांकडच्या ब्राह्मणांच्या हातावर होम करावा. एकोद्दिष्टाचे जे ब्राह्मण त्यांचे हातावर होम कृताकृत आहे. होम झाल्यावर सव्याने परिसमूहन व पर्युक्षण करावे. पाणिहोमात प्रेक्षण व अनुप्रहरण करू नये. कित्येक ग्रंथकार पाणिहोमात परिसमूहन इत्यादिक प्रेक्षणही इच्छित नाहीत. ब्राह्मणांनी हातावर होम केलेले अन्न कर्त्याने देवपूर्वक सव्यानेच 'आमासुपक्वं' या मंत्राने अभिघार केलेल्या आपापल्या पात्रावर ठेवून भोजनस्थानाहुन अन्यस्थली आचमन करून पुनः आपल्या स्थानी येऊन बसावे. अग्नौकरण करून शेष राहिलेले अन्न पिंडासाठी ठेवून पितरांकडचे ब्राह्मणांच्या पात्रांवरच सर्व पदार्थ वाढल्यावर ते वाढावे. अग्नौकरणाचे शेष अन्न वाढल्यावर इतर सर्व पदार्थ वाढावेत असे काही ग्रंथकार म्हणतात. अग्नौकरणाचे शेष अन्न देवांचे पात्रांवर वाढू नये. साग्निक कात्यायनांनी अग्नीमध्ये अग्नौकरण होम असता देवपूर्वक सर्व पात्रांवर शेष अन्न वाधावे. निरग्निकांस देवाकडच्या ब्राह्मणांचे हस्तावर होम असता पितरांच्या पात्रावरच शेष अन्नदान, पितरांच्या ब्राह्मणांचे हस्तावर होम असेल तर देवादिक सर्व पात्रांवर शेष अन्नदान, असे श्राद्धकाशिका ग्रंथात सांगितले आहे. हस्तावर हवन केलेले व पात्रावर वाढिलेले सर्व अन्न एकत्र करूनच भक्षण करावे. निराळे भक्षण करू नये. बहुधायन शाखीयांस तर हस्तावर हवन केलेले अन्न भक्षण केल्यावर दुसरे अन्न वाढावे असे सांगितले आहे.
यावर पुर्वी सांगितल्याप्रमाणे देवपूर्वक घृताचा अभिघार केलेल्या पात्रावर पूर्वी सांगितलेले हविष्यान्न स्वतः स्त्रीने किंवा दुसर्या कोणी काढावे. अपवित्र हाताने कुशावाचून एका हाताने व लोखंडाच्या पात्राने श्राद्धामध्ये पदार्थ वाढू नयेत. कोशिंबरी, चटण्या, इत्यादि पदार्थ पान इत्यादिकाने अंतरहित हस्तांनी वाढावे. तूप, अन्न व सर्व चटण्याकोशिंबरी, इत्यादि पदार्थ व उदक पळीने वाढावे. पण पक्वान्न पळीने वाढू नये. हाताने वाढलेले लवण, चटण्या, कोशिंबरी इत्यादि पदार्थ भक्षण करू नयेत. अपक्व व तैलपक्व पदार्थ हातानेच वाढावेत. घृतादिक पदार्थांची पात्रे भूमीवर ठेवावी, भोजनपात्रावर ठेवू नयेत. भात व क्षीर यात पात्र ठेवून त्या पात्रात तूप वाढले असता ते रुधिरसमान होय. पंक्तीत एकास कमी व एकास अधिक अशा भेदबुद्धीने वाढणाराच्या पापाचा नाश होण्यासारखे प्रायश्चित्त नाहीच. पितृकृत्यात सर्वदा विशेषतः तिळ घ्यावेत. भोजनपात्रावर तिळ पाहून पितर निराश होऊन जातात. हिंग, सुंठ, पिंपळी, मिरे, हे पदार्थ शाकादिकांचा संस्कार म्हणजे फोडणी, इत्यादिकात परिणाम झालेले भक्षण करू नयेत. पदार्थ वाढण्याच्या वेळीच ते सर्व अन्न पिंडाकरिता पिंडपात्रावर वाढावे, असे श्राद्धसागर ग्रंथात सांगितले आहे.