ज्यास स्मार्ताग्नि असेल त्याचा स्मार्ताग्नि विच्छिन्न झाला असेल तर ज्या दिवसापासून अग्नीचा विच्छेद झाला तितके दिवस मोजून पूर्वार्धात सांगितल्याप्रमाणें तत्कालींच प्रायश्चित्त करावें किंवा संकल्प करावा. प्रायश्चित्त केल्यावर तितक्या कालाची गणना करुन होम द्रव्य व स्थालिपाक द्रव्य द्यावे. नंतर अरणी पक्ष असेल तर पूर्वीप्रमाणें अरणीचें मथन करावें. दुसरा पक्ष असल्यास '' अमुक शर्मणोऽग्नि विच्छेद निमित्तकं दाहायाग्नि सिध्यर्थ प्रेताधानं करिष्ये '' असा संकल्प करावा व त्या स्थानीं सर्व सामग्री सिद्ध करुन लौकिकाग्नीची स्थापना करावी; व आज्यास संस्कार करुन '' अयाश्च '' या मंत्रानें व '' यस्याग्नयो '' या पूर्वोक्त मंत्रानें हवन करुन ४ व्याहति मंत्रांनी होम करावा. असें केलें असतां औपासनाग्नि सिद्ध होतो. पत्नी मृत असतांही असाच निर्णय जाणावा, असें भट्ट म्हणतात. विधुरानेंही श्रौताग्नि धारण केले असतील तर यथायोग्य त्या त्या अग्नीनें दहन करावें. विधुरानें अग्नि धारण केल्यानंतर त्याचा नाश झाल्यास पूर्वोक्त रीतींनी त्या त्या अग्नीचें आधान करावें.
गृह्याग्नि धारण न केलेला सपत्निक व विधुर, ब्रह्मचारी व समावर्तन झालेला, अनुपतीन पुत्र व अविवाहित कन्या निराग्निक भार्या व विधवा यांचा दाह कपालाग्नीनें किंवा लौकिकाग्नीनें करावा. अग्निवर्ण कपालांत गोवरी इत्यादि साधनानें उत्पन्न केलेला व '' भूर्भुवः स्वःस्वाहा '' या मंत्रानें आज्याहुतीनें संस्कार केलेला जो अग्नि तो कापाल अग्नि होय. लौकिक अग्नि घेणें तो अंत्यजाग्नि, पतिताग्नि, सूतिकाग्नि, चिताग्नि व अशुद्धाग्नि यांवांचून घ्यावा. अग्नि, तृण, काष्ठें व होम द्रव्यें ही ज्याची शूद्र आणितो त्याचें प्रेतत्व सर्वकाळ राहतें व तो शूद्र पापानें लिप्त होतो. आहिताग्नि दंपतींतून पूर्वी पति मृत झाल्यास सर्व अग्नीनी पतीचें दहन करावे. पश्चात् मृत झालेल्या स्त्रीचें दहन निर्मथ्याग्नीनें किंवा कपालाग्नीनें करावें. पूर्वी स्त्री मृत झाल्यास सर्व अग्नींनी तिचें दहन करावें. सर्व पात्रेंही द्यावीं. स्त्रीच्या मागून पति मृत झाल्यास पुनराधान करुन ३ अग्नि असतां त्यांनीं दहन करावें. आधान केलें नसल्यास निर्मथ्याग्नि किंवा लौकिकाग्नी यांतून एकानें दहन करावें, असें कोणी ग्रंथकार म्हणतात; व याज्ञिकांचा आचारही बहुधा असाच आहे.
निर्णयसिंधूः --- साग्निकाची स्त्री मृत झाल्यास २ पक्ष. पुनः विवाह करण्याची इच्छा असल्यास पूर्वीच्या अग्नीनें स्त्रीचें दहन करुन पुनः विवाह करुन पुनराधान करावें, असा असा एक पक्ष; पतीनें सुशील अशा स्त्रियेचें अग्निहोत्रानें दहन करावें, इत्यादिक सर्व वचनें पुनः विवाह करुं इच्छिणाराविषयींच होत. पुनः विवाह करण्यास असमर्थ असल्यास निर्मर्थ्याग्नीनें तिचें दहन करुन पूर्वीच्या अग्नीचे ठायींच अग्निहोत्र, इष्टि व चातुर्मास्यादिक करावें. सोमयाग करुं नये. पूर्वीच्या अग्नींतून अल्प अग्नी घेऊन त्यानें दहन करावें, असें यजपार्श्व व देवयाज्ञिवचनें आहेत ती पूर्वीचे अग्नीचे ठायींच अग्निहोत्र धारण करणाराविषयीं होत. अपत्निकांस आधानाचें विधान सांगणारी नव्हत. कारण अपत्निकास आधानाचा विधि सांगणारें मूळ वचन नाही. '' विवाहास जर असमर्थ असेल तर आपणासाठीं अग्नीचें आधान करावें '' असें जें आपस्तंभ सूत्र तें पुनः विवाह करण्यास सामर्थ्य नसतां पूर्वी केलेल्या अग्नीचें आधान आपणासाठींच ठेवावें, स्त्रियेस देऊं नये याविषयी आहे. ब्राह्मणभाष्य, अपरार्क, आशार्क, रामांडार इत्यादि ग्रंथांचे मतही असेंच आहे. अपत्निकानें आधान करावें असें जें ग्रंथकार म्हणतात तें आह्मी जाणत नाहीं. असें जें निर्णयसिंधूचें मत तेंच योग्य आहे असें वाटतें. याज्ञिकांचा आचार तर अंतरगत जी गुप्त विवाहाची इच्छा तन्मूलक आहे. प्रामाण्य दाखविणारा नाहीं. पुनः विवाहाचे आशेनें सर्व अग्नि दिले मग विवाहाचा असंभव असेल तर निर्णयसिंधूच्या मतानें आधानाचा अभाव असतां निर्मथ्याग्नीच ग्रहण करावा. कित्येकांच्या मतें पुनराधान करावें, याविषयी निर्मथ्याग्नि इत्यादिकानें पूर्वी मृत झालेल्या स्त्रियेचें दहन करावें, अशा पक्षीं पूर्वीच्या अग्नीचा उत्सर्गेष्टीनें त्याग करुन पुनराधान करुन अग्निहोत्र करावें, असें कांहीचें म्हणणे आहे. याप्रमाणें स्मार्ताग्निमान याची स्त्री पूर्वी मरण पावली असतांही गृह्याग्नीच्या एक देशानें तिचें दहन करावें व अवशिष्टाग्नीचे ठायीं नित्य होम, स्थालीपाक, आग्रयण हीं करावींत. येथें सर्वत्र ठिकाणीं श्रौतस्मार्ताविषयींही कुशपत्नी विधानानेंच आधानादि कर्माचा अधिकार आहे.
ज्यास अनेक भार्या असतील त्याची ज्येष्ठ भार्या जिवंत असून कनिष्ठ भार्या मरण पावल्यास निर्मथ्य इत्यादि अग्नीनेंच तिचें दहन करावे. श्रौतस्मार्ताग्नींनीं दहन करुं नये. पूर्वी सर्व अग्नींनी कनिष्ठेचें दहन करुन ज्येष्ठ पत्नीसहवर्तमान पुनराधान करावें, असें कांही ग्रंथकार म्हणतात. तें दोन अग्नींचा संसर्ग जेथें असतो तत्पर किंवा दुसरें जें मत तत्पर आहे, असें जाणावे. दहनकालीं अग्नीचा नाश होईल तर यजमान चितारुढ करुन यज्ञ पात्रें स्थापन केलीं असतां चितेवरील अग्नि पर्जन्यवृष्टि इत्यादिकानें नष्ट झाल्यास ती अर्धदग्ध झालेलीं काष्ठें मंथन करुन त्या अग्नीनें त्याचें दहन करावें.