तीर्थयात्रा करू इच्छिणाराने पूर्वी घरी उपोषण करून पारणेच्या दिवशी वृद्धिश्राद्ध धर्माने युक्त घृतश्राद्ध करावे; षडदैवत, नवदैवत किंवा द्वादशदैवत व बहुत घृताने युक्त अशा अन्नाने श्राद्ध करावे. अन्न निवेदन काली
'इदंघृतं सान्नंदत्तं दास्यमानंच'
इत्यादि वाक्य म्हणावे- गणेश, विप्र व साधू यांची यथाशक्ति पूजा करूच यात्रेचा संकल्प करावा व श्राद्ध शेषाने पारणा करून प्रयाण करावे, असे काही ग्रंथकार म्हणतात. दुसर्या ग्रंथकाराचे असे मत आहे की, श्राद्ध केल्यावर यात्रेचा संकल्प करून श्राद्धशेष घृत मात्र घेऊन एक कोसापेक्षा कमी अशा दुसर्या गावी जाऊन तेथे श्राद्धशेष घृतसहित दुसर्या अन्नाने पारणा करावी.
'श्रीपरमेश्वरः प्रीतिकामः पित्रमुक्तिकामोवाअमुकप्रायःश्चित्तार्थवा तीर्थयात्रांकरिष्ये'
असा संकल्पात ऊह करावा. उपवासापूर्वी मुंडण करावे असे काही ग्रंथकार म्हणतात. दुसर्या ग्रंथकारांचे मत असे आहे की, प्रायःश्चिताचे यात्रेच्या वेळी मुंडण करावे. याप्रमाणे गयेच्या उद्देशाने केलेल्या यात्रेत मुंडणाचा विकल्प आहे. गयेस जाण्यास उद्युक्त झालेल्याने घृतादिक श्राद्ध करून तीर्थाटन करणाराचा वेष धारण करावा, व स्वकीय ग्रामास प्रदक्षिणा करून प्रतिगृह विवर्जित होऊन प्रतिदिवशी प्रयाण करावे. जो राजा आपल्या शक्त्यनुसार द्रव्याने व वाहनाने दुसर्याकडून यात्रा करवील त्यास चतुर्गुण पुण्य प्राप्त होते. यात्रेत अशौच किंवा रजोदोष प्राप्त झाल्यास त्याच्या शुद्धीपर्यंत राहून नंतर प्रयाण करावे. विषम मार्ग असेल तर दोष नाही.
संकल्पित यात्रेस जात असता मार्गात अन्य तीर्थ लागल्यास श्राद्धादिक अवश्य करावे. व्यापारासाठी तीर्थास गेलेल्यांनाही मुंडण, उपोषण, इत्यादि करावे. दुसर्या कार्यप्रसंगाने तीर्तास गेल्यास अर्धेफल, व्यापारासाठी गेल्यास चतुर्थांश फल, मार्गात द्विवार भोजन, इत्यादिक केले व छत्री जोडा यांचे सेवन केले तर चतुर्थांश न्यून फल, वाहनावर आरोहण करून प्रयाण केल्यास अर्धे फल. दुसर्याच्या अनुषंगाने तीर्थ प्राप्त झाल्यास तीर्थस्नानाने स्नानसंबंधी फल मिळते. तीर्थयात्रेचे फल मिळत नाही. मार्गात नदी प्राप्त झाल्यास नदीच्या पलीकडील तीरावर स्नानादिक करावे. सरस्वती नदीच्या अलीकडील तीरावरच स्नानादिक करावे. हा मार्गसंबंधी विधि झाला.