आचार्य मृत झाल्यास त्रिरात्र, अन्यग्रामी मृत झाल्यास पक्षिणी. उपनयन करुन वेद पढविणारा तो आचार्य. स्मार्त कर्माचा निर्वाहक तोही आचार्य होय. आचार्याची स्त्री किंवा पुत्र मरण पावल्यास १ दिवस अशौच. मंत्रोपदेश करणारा गुरु मरण पावल्यास त्रिरात्र. दुसर्या गावी असल्यास पक्षिणी अशौच. शास्त्र पढविणारा व व्याकरण, ज्योतिःशास्त्र, इत्यादि अंगे शिकविणारा व अनुचान संज्ञक हे मृत झाल्यास १ दिवस अशौच. सर्व वेद पढविणारा गुरु मृत झाल्यास पक्षिणी. वेदाचा काही भाग पढविणारा तो उपाध्याय; तो मृत झाल्यास १ दिवस अशौच. उपनयन करून अध्ययन शिकविलेला शिष्य मरण पावल्यास त्रिरात्र अशौच. अध्ययन समाप्त झालेला शिष्य मरण पावल्यास पक्षिणी. दुसर्याने उपनयन केलेला असूनही पुष्कळ दिवस अध्ययन शिकविलेला शिष्य मृत झाल्यास १ दिवस अशौच. सहाध्यायी मृत असता पक्षिणी. ऋत्विक कर्म समाप्त न केलेला ऋत्विक मृत झाल्यास त्रिरात्र, दुसर्या गावी असेल तर पक्षिणी. कर्मनिवृत्ति असेल तर अन्यग्रामी १ दिवस. एकाच गावात पक्षिणी. याप्रमाणे याज्य म्हणजे यजमान मृत असताही असाच निर्णय जाणावा. वेदाचे सार्थ अध्ययन करणारा व श्रौतस्मार्त कर्मनिष्ठ श्रोत्रिय मरण पावल्यास मैत्री व गृहसान्निध्यादि संबध असेल तर त्रिरात्र अशौच. दोहोतून एक संबंध असल्यास पक्षिणी व संबंधाचा अभाव असेल तर एक दिवस, आपल्या वर्णातील मित्र मृत असल्यास १ दिवस अशौच. संन्याशी मरण पावल्या सर्व सपिंडांनी स्नान मात्र करावे. आपल्या घरी उदासीन असा असपिंड मरण पावल्यास १ दिवस अशौच. आपल्या राहण्याच्या घरी असपिंड मरण पावल्यास ३ दिवस अशौच. अशौचाचा उत्पादक संबंधी स्वगृही मृत झाल्यास त्रिरात्र; ग्रामाधिपति, देशाधिपति, इत्यादिक मरण पावले असता सज्जोति शुद्धि म्हणजे दिवसामृत असता रात्रौ स्नानाने शुद्धि; व रात्रौ मृत असता दिवसा शुद्धि, असा सजोति पदाचा अर्थ आहे. दिवसा मरण असता तो दिवस, ती रात्र व दुसर्या दिवशी नक्षत्र दर्शनापर्यंतचा काळ असा पक्षिणी पदाचा अर्थ आहे. येणारा व वर्तमान अशा दोन दिवसांनी युक्त मध्यगत रात्र ती पक्षिणी. रात्री मृत असेल तर ती रात्र तिच्यापुढील अहोरात्र मिळून पक्षिणी. रात्री मृत असताही मरण दिवसापासून दुसर्या दिवसाच्या नक्षत्रापर्यंतच पक्षिणी, असा काही ग्रंथकार पक्षिणीपदाचा अर्थ करितात. याप्रमाणे अतिक्रांत अशौचाविषयी दिवसा अथवा रात्री जसे मरणाचे ज्ञान होईल म्हणजे मृत झाल्याचे समजेल त्याप्रमाणे पक्षिणीची व्यवस्था योजावी.
आचार्य, मातुल, इत्यादिकांचे जे त्रिरात्रादिक अशौच सांगितले ते अंत्यक्रिया करणारा दुसरा असता जाणावे. शिष्यादिक अंत्यक्रिया करणारे असतील तर १० दिवस इत्यादिकच अशौच जाणावे.