समंत्रक अग्नीनें दहन झाल्या दिवसापासून पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, सातवा अथवा नववा या दिवशीं गोत्रजांसहवर्तमान आपापल्या सूत्रांत सांगितल्याप्रमाणें अस्थिसंचयन करावें. तें करतांना द्विपाद व त्रिपादनक्षत्रें व कर्त्याचें जन्मनक्षत्र हीं वर्ज करावींत. शक्य असल्यास रवि, भौम व शनि हे वार वर्ज करावेत. पालाशविधीनें दहन व अस्थिदहन असतां तत्कालीं अस्थिसंचयन करावें. अस्थि गंगेच्या उदकांत अथवा दुसर्या तीर्थात टाकाव्या. त्याविषयी विधि पुढें सांगेन. अरण्यांत अथवा वृक्षमूळाचे ठायीं अस्थि पुरुन ठेवाव्या. अन्य कुळांतील मनुष्याच्या अस्थि नेल्यास चांद्रायण करावें. दुसर्याच्याही अस्थी दयेनें नेल्या असतां महापुण्य प्राप्त होते. कुत्रा, डुकर, शूद्र इत्यादिकांचा स्पर्श अस्थींस झाल्यास पंचगव्य, शालग्राम व तुळसी यांच्या उदकानें प्रोक्षण करावें. अशौचांत आपल्या गोत्रजांसहवर्तमान दिवसाच भोजन करावें. भोजन मृत्तिकापात्रांत अथवा पत्रावळीवर करावें. धातुपात्रांत भोजन करुं नये.