बुद्धिपूर्वक आत्महत्या करुन मरणाराविषयी ३० कृच्छ्र प्रायश्चित्त. हें प्रायश्चित्त जातिवधाचे प्रायश्चित्तासह करावें. तें असें: - ब्राह्मणानें आत्महत्या केल्यास द्वादशाब्द असें ब्रह्महत्याप्रायश्चित्त व ३० कृच्छ्रें आत्महत्या प्रायश्चित्त, अशीं २ प्रायश्चित्तें पुत्रादिकांनी करावी. ब्राह्मणस्त्रीनें आत्महत्या केल्यास ब्राह्मणस्त्रीवधाचें प्रायश्चित्त व ३० कृच्छ्र हें करावी. याप्रमाणें शूद्रादिकानें आत्महत्या केली असतांही जाणावे. आत्महत्या केली असतां पूर्वोक्त प्रायश्चित्तें करण्यास सामर्थ्य नसेल तर २ चांद्रायणें व ४ तप्त कृच्छ्रें ही करावी. असावधपणानें जलादिकांपासून मरण आल्यास १५ कृच्छ्र किंवा चांद्रायणपूर्वक २ तप्त कृच्छ्रें करावी. पतित मृत असतां १६ कृच्छ्रें. ब्रह्महत्यादि पातक्यांस प्रायश्चित्तापूर्वी मरण आल्यास त्या त्या पापाचें प्रायश्चित पुत्रानें करावें. प्रायश्चित्तास अयोग्य असणारांचा पतितोदक विधीच करावा. प्रायश्चित्तादि करुं नये, असें सांगितलें आहे. प्रायश्चित्तास अयोग्य असले तरी त्यांचे पुत्रादिकांनी नारायणबलिपूर्वक सर्व अंत्यकर्म, सपिंडीकरण, दर्शादिश्राद्ध, गयादिश्राद्ध, हीं करावींच; असें निर्णयसिंधूंत सांगितलें आहे. याप्रमाणें म्लेंछ झालेल्याचेंही पूर्वोक्त सर्व कर्म करावें. पतितोदक विधि सांगितला तो अपुत्नविषयक आहे, असें सांगितलें आहे; व हेंच योग्य आहे.