ब्राह्मणांचे भोजन झाल्यावर प्राचीनावीती करून 'तृप्ताःस्थ' असे ब्राह्मणास विचारून 'तृप्ताःस्म' असे ब्राह्मणांनी प्रतिवचन दिल्यावर गायत्री मधुवाता या तीन ऋचा व 'अक्षन्नमि' हे मंत्र श्रवण करवावेत. अथव 'अक्षन्नमि' ही ऋचा म्हटल्यावर तृप्तिप्रश्न करून 'श्राद्धसंपन्न' असे विचारून 'सुसंपन्न' असे प्रतिवचन मिळाल्यावर पात्रे वाढताना पिंडाकरिता अन्न काढून ठेवलेले नसेल तर या वेळी सर्व अन्नातून पिंडाकरिता व विकिराकरिता अन्न काढून ठेवावे. शेषान्नाचे काय करावे? असे कर्त्याने ब्राह्मणास विचारावे. इष्टांसहवर्तमान भोजन करावे. असे ब्राह्मणांनी प्रतिवचन पूर्वी देऊन सर्व अन्न श्राद्धकर्त्यास द्यावे. अथवा आपण घ्यावे याप्रमाणे यथारुचि करावे. कात्यायनांनी तर ब्राह्मण तृप्त झाले हे जाणून पुढे सांगितला जाणारा जो प्रकार त्याने विकिर देवांकडे व पितरांकडे देऊन ब्राह्मणास एकवार पितृपूर्वक उदक देऊन गायत्री व मधुमती ऋचा हे मंत्र श्रवण करवावे, व तृप्तिप्रश्न व संपत्तिप्रश्न करावे. याप्रमाणे अन्यशाखीयांनीही उत्तरापोशनापूर्वीच विकिर द्यावा. ऋग्वेदी यांनी पिंडदानानंतरच विकिर द्यावा. हिरण्यकेशीयांनी ब्राह्मणांनी आचमन केल्यावर विकिर द्यावा.
यानंतर 'उच्छिष्टभाग्भ्योन्नं दीयता' असे ब्राह्मणास सांगितल्यावर ब्राह्मणांनी भोजन करून शेष राहिलेले पात्रावरील अन्न देवाकडच्या ब्राह्मणांनी पात्राच्या दक्षिणभागी व पितरांच्या ब्राह्मणांनी पात्राच्या वामभागी बाहेर ठेवावे; व पितृपूर्वक दिलेले आपोशन 'अमृता पिधानमसि' या मंत्राने घ्यावे. ब्राह्मणांनी आचमन केल्यावर किंवा आचमनाचे पूर्वी पिंडदान करावे. ब्राह्मणांनी मुखप्रक्षालन करणे ते शराव (मृत्तिका पात्र) इत्यादि पात्रात करावे. कास्य पात्रात किंवा ताम्र पात्रात करू नये. शुद्धोदकाने आचमन करून 'कयान' या ऋचेचा जप करावा.