नंतर मौनधारी मुखशब्द व चापल्यरहित अशा ब्राह्मणांनी पात्रावर शेष ठेवून भोजन करावे. दही, दूध, घृत व पायस हे पदार्थ सर्व भक्षण करावे. ब्राह्मणाने स्वतः आपोशन घेतले असता (ब्रह्मार्पण एकोविष्णु) हा संकल्प केला असता व छिद्रभाषण म्हणजे पाकासंबंधी खारट, तिखट इत्यादि दोष काढले असता पितर निराश होऊन जातात. आपोशन दक्षिणभागी करावे. वामभागी करू नये. आपोशनाद उदक एकदाच पूर्ण घ्यावे, पुनः पूर्ण केले असता ते सुरापानासारखे होते. आपोशन घेतल्याशिवाय कधीही अन्न मर्दन करू नये. ब्राह्मणांनी चित्राहुति घालू नयेत. कित्येक घृताच्या चित्राहुति घालतात पण ते योग्य नाही, कारण पायस, घृत व माषान्न यांच्या आहुति घालण्याविषयी निषेध आहे. ब्राह्मणांनी डाव्या हाताने अन्नास स्पर्श करू नये. व पायाने पात्रस स्पर्श करू नये. सिद्ध केलेले पदार्थच हातांनी खुणेने मागावेत. सिद्ध न झालेले पदार्थ मागू नयेत. अन्नाचे गुणदोष बोलू नयेत. कर्त्याने निषिद्ध नसलेले पदार्थ व भोक्त्यास, पित्यास प्रिय असलेले पदार्थ द्यावेत व त्या त्या अन्नाच्या माधुर्यादि गुणांच्या कथनाने रुचि उत्पन्न करून देतो असे न म्हणता जे मागतील ते द्यावे. भोजन करणाराकडे पाहू नये. पदार्थांचे गुण विचारू नयेत. दैन्य, अश्रुपात, क्रोध इत्यादिक न करिता पिण्यास पाणी देऊन ब्राह्मणास सावकाश जेववावे. लवणादिक पदार्थ 'पाहिजेत' असे विचारिले असता त्याचे पितर उच्छिष्ट होऊन जातात.
नंतर सव्याने व्याह्रतिसहित गायत्रीमंत्र ३ वेळ म्हणून पुरुषसूक्त 'कृणुष्वपाजः व रक्षोहणं' इत्यादि रक्षोघ्नि ऋचा पितर आहे लिंग ज्याचे अंशी ते इंद्र, ईश व सोम यांची सूक्ते, पावमानी सूक्ते, अप्रतिस्थ संज्ञक 'आशुःशिशान०' सूक्त विष्णु, ब्रह्मा, रुद्र व अर्क यांची स्तोत्रे इत्यादिक भोजनकर्त्या ब्राह्मणांकडुन श्रवण करवावी इतकी सूक्ते श्रवण करविणे अशक्य असेल तर गायत्री मंत्राचा जप करावा. वीणा, मुरली यांचा ध्वनी ब्राह्मणांस श्रवण करवावा. मंडल ब्राह्मण, नाचिकेत त्रय, त्रिमधु, त्रिसुपर्ण, पावमान अशी यजुर्वेदातिल सूक्ते आशुःशिशान सुक्त व आग्नेय कव्यवाहन ही सूक्ते श्रवण करवावी. पायावर पाय चढवून कक्षा बाहेर करून म्हणजे आसनमर्यादा सोडून जानूच्या बाहेर हात ठेवून अंगुष्ठाशिवाय केवळ अंगुलीनीच जो खातो किंवा मिटक्या मारीत भोजन करितो व एकदा जलपान करून पात्रात शेष राहिलेले उदक पुनः घेऊन पान करितो, मोदकादिक व फलादिक पदार्थ अर्धे भक्षण पात्रावर ठेवून जर पुनः भक्षण करील किंवा मुखाने अन्नावर फुंकर मारील अथवा पात्रात थुंकी टाकील, अशा रीतीने ब्राह्मण भोजन करील तर तो ते श्राद्ध व्यर्थ करून अधोगतीस जातो. श्राद्धपंक्तीत भोजन करणारा ब्राह्मण जर दुसर्या ब्राह्मणास स्पर्श करील तर त्याने ते पात्रावरचे अन्न न टाकता भोजन करावे. व १०८ गायत्री जप करावा. भोजनपात्रात दुसर्या ब्राह्मणाचे उच्छिष्टाचा संसर्ग झाल्यास ते अन्न टाकून हात धुवून भोजन करुन स्नान करावे; व २०० गायत्री जप करावा. उच्छिष्ट अन्न भक्षण केल्यास सहस्त्र गायत्री जप करावा. ब्राह्मण भोजन करीत असता प्रमादाने जर गुदस्त्राव होईल तर पादकृच्छ्र करून दुसरा ब्राह्मण बसवावा.