कात्यायनांनी सायंकाळी सूर्यास्तानंतर होम करावा व प्रातःकाली सूर्योदयापूर्वी होम करावा. तो असा- प्रातःकाली उपस्थानापर्यंत संध्या करून होम केल्यानंतर गायत्रीजप वगैरे बाकी राहिलेली संध्या समाप्त करावी. त्याविषयी पूर्वी सांगितल्याप्रमाणे संकल्प केल्यानंतर उपयमन नामक दर्भ आणून ते डाव्या हातात घेऊन नंतर उजव्या हाताने तीन समिधा अग्नीमध्ये देऊन कलशातील उदकाने पर्युक्षण करावे. नंतर अग्नीची पूजा करून सायंकाली
"अग्नये स्वाहा, प्रजापतये स्वाहा"
या आहुतींनी दधि अथवा तांदूळ यांचे हवन करावे. प्रातःकाली याचप्रमाणे सूर्य व प्रजापति यांना हवन करावे. "समास्त्व०" या अनुवाकाने सायंकाळी उपस्थान करावे. "विभ्राट०" या अनुवाकाने प्रातःकाली उपस्थान करावे. दही इत्यादिकाने हे हवन केले असल्यास संस्त्रावाचे प्राशन करावे असे सांगितले आहे. होमाचा लोप झाल्यास १००८ गायत्रीजप करावा. मुख्य कालाचा अतिक्रम झाल्यास अनादिष्ट होम करावा (म्हणजे अग्नि १, वायु २, सूर्य ३, प्रजापति ४, अग्नीवरुणौ ५, अग्नीवरुणौ ६, अयाअग्नि ७, वरुण, सविता, विष्णु, विश्वेदेव, मरुत, स्वर्क ८, वरुण, आदित्य, अदिति ९ अशा नऊ देवतांच्या उद्देशाने नऊ आहुतींनी होम करावा.)