अत्रि चार आहेत - १ अत्रि, २ गविष्ठिर, ३ वाद्भुतक आणि ४ मुद्गल
१. अत्रि, भूरि, छांदि इत्यादिक चवर्याण्णवांपेक्षा अधिक अत्रि आहेत. यांचे प्रवर -आत्रेय, आर्चनानस, श्यावाश्व याप्रमाणे तीन आहेत.
२. गविष्ठिर, दक्षि, भलंदन इत्यादिक चौविसांपेक्षा अधिक गविष्ठिर आहेत. यांचे प्रवर-आत्रेय, आर्चनानस, गविष्ठिर असे तीन आहेत. अथवा आत्रेय, गाविष्ठिर, पौर्वातिथ याप्रमाणे तीन आहेत.
३. वाद्भुतक यांचे प्रवर -आत्रेय, आर्चनानस वाद्भुतक याप्रमाणे तीन प्रवर आहेत.
४. मुद्गल, शालिसंधि, अर्णव इत्यादिक दहांपेक्षा न्यून मुद्गल आहेत. यांचे प्रवर- आत्रेय, आर्चनानस, पौर्वातिथ याप्रमाणे तीन आहेत. क्वचित ग्रंथामधे अतिथि, वामरथ्य, सुमंगल, बीजवाप, धनंजय असे पाच गण अधिक सांगितले आहेत. त्यामध्ये पहिले जे चार त्यांचे प्रवर आत्रेय, आर्चनानस, श्यावाश्व याप्रमाणे तीन आहेत. अथवा आत्रेय, आर्चनानस गाविष्ठिर असे तीन आहेत. सुमंगल जे त्यांचे प्रवर- अत्रि, सुमंगल, श्यावाश्व असे तीन आहेत. धनंजय जे त्यांचे प्रवर-आत्रेय, आर्चनानस, धानंजय याप्रमाणे तीन आहेत. वालेय, कौंद्रेय, शौभ्रेय, वामरथ्य इत्यादिक अत्रीच्या कन्येचे पुत्र आहेत. यांचे प्रवर-आत्रेय, वामरथ्य, पौत्रिक याप्रमाणे तीन आहेत. अत्रि जे सर्व यांचा परस्पर विवाह होत नाही; कार, सर्व अत्रींचे गोत्र एक आहे, व प्रवरहि सर्वांचे एकसारखे आहेत. अत्रीच्या कन्येचे पुत्र जे वामरथ्यादिक त्यांचा वसिष्ठ, विश्वामित्र यांच्याशी विवाह होत नाही. याप्रमाणे अत्रिगण सांगितला.