विवाहापासून सोळा दिवसपर्यंत सम दिवशी; आणि पाचवा, सातवा, नववा या दिवशी रात्री स्थिर लग्नी नूतनभिन्न अशा गृही वधूचा प्रवेश शुभ होय. क्वचित ग्रंथात प्रथम दिवशी देखील शुभ सांगितला आहे. प्रयोगरत्नग्रंथात सहाव्या दिवशी निषेध सांगितला आहे त्याला आधार नाही. सोळा दिवसांपैकी वर सांगितलेल्या दिवशी वधूप्रवेशाला, प्रवेशाला उक्त अशी नक्षत्रे, तिथि, वार, गोचरस्थ चंद्रबल, इत्यादिकांचा अभाव असताही व गुरुशुक्रादिकांचा अस्त असेल तथापि, दोष नाही. प्राप्त काल असेल तथापि व्यतीपात, क्षयतिथि, ग्रहण, वैधृति, अमावास्या, सूर्यसंक्रांति आणि भद्रा असतील तर वर्ज्य होय. म्हणजे वरील शुभ दिवशी हे कुयोग येतील तर ते दिवस वर्ज्य समजावे. नववधूचा पहिल्याने गृहप्रवेश आणि विवाहाकरिता गमन याविषयी प्रतिशुक्राचा दोष नाही. दुसर्या प्रवेशाचे वेळीच संमुख शुक्राचा दोष आहे. सोळा दिवसांनंतर आणि महिन्याच्या पूर्वी विषम दिवशी, एक महिन्यानंतर विषम मासी, आणि एक वर्षानंतर विषमवर्षी वधूप्रवेश शुभ होय. सोळा दिवसांनंतर सम दिवस. सममास, सम वर्ष यांमध्ये वधूप्रवेश केला असता वैधव्यादि दोष येतो. पाच वर्षे झाली तर समविषम यांचा विचार नाही. सोळा दिवसांनंतर वधूप्रवेश करण्यास अश्विनी, रोहिणी, मृग, पुष्य, मघा, तीन उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाति, अनुराधा, मूळ, श्रवण, धनिष्ठा, रेवती ही नक्षत्रे शुभ होत. एक मास झाल्यानंतर मार्गशीर्ष, माघ, फाल्गुन, वैशाख, ज्येष्ठ हे मास शुभ होत. चतुर्थी, नवमी, चतुर्दशी, पौर्णिमा व अमावास्या या तिथि खेरीजकरून इतर तिथि आणि रविवार व मंगळवार खेरीज करून इतर वार शुभ होत. याप्रमाणे नववधूप्रवेशाचा निर्णय सांगितला.