या दोषाचा परिहार होण्याकरिता मूर्तीचे दान करावे. कन्येने देशकालादिकांचा उच्चार करून "वैधव्यहरं श्रीविष्णुप्रतिमादानं करिष्ये" असा संकल्प करावा. पल (४० मासे), अर्ध पल, चतुर्थांश पल यातून एका प्रमाणाने सुवर्णाची श्री विष्णूची प्रतिमा चतुर्भुज, सायुध अशी तयार करून पूर्वी पसंत केलेल्या आचार्याकडून तिची अग्न्युत्तारणपूर्वक षोडशोपचार पूजा करावी. पूजेमध्ये वस्त्र अर्पण करण्याचे वेळी दोन पिवळी वस्त्रे व पुष्पे अर्पण करण्याचे वेळी कुमुदे व कमळे यांची माळा अर्पण करावी. पूजा झाल्यावर कन्येने मूर्तीला प्रणाम करून तिचे दान करावे. दानाचा मंत्र -
"यन्मया प्राञ्चि जनुषि घ्नन्त्यापतिसमागमम । विषोपविषशस्त्राघैर्हतोवापि विरक्तया ॥ प्राप्यमाणं महाघोरं यशःसौख्यधनापहम । वैधव्याद्यति दुःखौघं तन्नशय सुखाप्तये ॥ बहु सौभाग्यवृद्ध्यैच महाविष्णोरिमां तनुम । सौवर्णी निर्मितां शक्त्या तुभ्यं संप्रददे द्विज ॥"
याप्रमाणे मंत्र म्हणून दान करावे. नंतर यथाशक्ति सुवर्ण दान करून 'अनघद्याहमस्मि" असे कन्येने त्रिवार म्हणावे व प्रत्येक वेळी आचार्यानेही 'एवमस्तु' असे म्हणावे. नंतर ब्राह्मणभोजन घालावे.