कर्म करीत असता अधोवायु सरणे, अश्रुपात, क्रोध, मार्जारस्पर्श, शिंक, वस्त्रपरिधान, रजक, चांडाल यांचे दर्शन यापैकी कोणतेही निमित्त झाले असता आचमन करावे. स्नान केल्यावर, उदक वगैरे प्राशन केल्यावर, भोजन केल्यावर आणि निद्रा केल्यावर आचमन करावे. मलोत्सर्ग, मूत्रोत्सर्ग व रेत यासंबंधाने शौच केल्यावर आचमन करावे. सर्वत्र आचमन करण्याचा असंभव असेल तर दक्षिण कर्णाला स्पर्श करावा. दातात अडकलेले अन्न संभाळून काढावे; कारण दातातून रक्त निघेल तर दोष सांगितला आहे. दातात अडकलेले अन्न ते दाताप्रमाणे होय. ते अन्न काही वेळाने निघेल तर निघाल्यावर आचमन करावे. डाव्या हातात दर्भ असता उजव्या हाताने आचमन करू नये. दोन्ही हातात दर्भपवित्रक धारण करून आचमन करावे. त्याने सोमपान केल्याचे श्रेय मिळते. ते पवित्रक उच्छिष्ट होत नाही. भोजन व पित्र्यकर्म केल्यावर पवित्रक टाकावे. मलोत्सर्व व मूत्रोत्सर्ग यानंतरही टाकावे.