स्वतः होम करणे हा मुख्य पक्ष. अशक्त असेल तर पत्नी, पुत्र, कन्या, भ्राता, शिष्य, भागिनेय, जामाता अथवा ऋत्विक यांजकडून करवावा. पुत्रादिकांनी हवन करणे ते यजमान व पत्नी सन्निध असता, निदान दोहोपैकी एक सन्निध असता करावे. त्याग यजमानाने अथवा पत्नीने म्हणावा. पत्नी सन्निध नसेल तर तिच्या आज्ञेवाचून देखील ऋत्विक इत्यादिकांनी त्याग म्हणावा. स्वतःच होम केल्याने जे फळ मिळते त्याच्या अर्धे फळ दुसर्याकडून होम करविल्यास मिळते. पर्वदिवशी स्वतःच होम करावा. त्याविषयी प्रातःखाळी सूर्योदयापूरी आणि सायंकाळी सूर्यास्तापूर्वी अग्नि (दक्षिणाग्नि, गार्हपत्य, आहवनीय) अथवा गृह्याग्नी प्रज्वलित करून अनुक्रमे सूर्योदयानंतर व सूर्यास्तानंतर होम करावा. अग्नि प्रज्वलित करण्याचा (प्रादुश्करणाचा) कालातिक्रम झाला असेल तर
"ॐभूर्भुवः स्वःस्वाहा"
या मंत्राने आज्यसंस्कारपूर्वक स्रुवापात्राने आज्याहुति द्यावी. हे प्रायश्चित्तरूप कर्म केल्यावर होम करावा. सूर्योदय झाल्यावर दहा घटिकांपर्यंत प्रातर्होमाचा मुख्य काल आहे; त्यानंतर सायंकालपर्यंत गौणकाल होय. सायंहोमाचा मुख्य काल सूर्यास्तानंतर नऊ घटिकांपर्यंत आहे; त्यानंतर प्रातःकालपर्यंत गौणकाल होय. मुख्य कालाचा अतिक्रम झाला असेल तर
"कालातिक्रमनिमित्तप्रायश्चित्तपूर्वकममुकहोमं करिष्ये"
असा संकल्प करून आज्यसंस्कार करावा. त्यानंतर स्रुचिपात्रामध्ये चार वेळा आज्य घेऊन सायंकाळी
"दोषावस्तर्नमः स्वाहा"
म्हणून हवन करावे; व प्रातःकाली
"प्रातर्वस्तर्नमः स्वाहा" म्हणून हवन करावे. याप्रमाणे प्रायश्चित्त झाल्यावर होमद्रव्याचा संस्कार करून नित्यहोम करावा. श्रोतहोम केल्यानंतर स्मार्तहोम करावा. स्मार्तहोम पूर्वी करावा असे कोणी ग्रंथकार म्हणतात. आधान, पुनरधान यांचे ठिकाणी होमाला सायंकाळी आरंभ करावा. सायंकाळी व प्रातःकाळी होमद्रव्य एक व कर्ताही एक असावा. प्रातःकाळी होम देणारा यजमान असेल तर सायंकाळी भिन्न कर्ता असा दोष नाही.