वधूला मुख्य गुरूबल आणि वराला मुख्य रविबल आहे. जन्मराशीपासून द्वितीय, पंचम, सप्तम, नवम आणि एकादश या स्थानाचा गुरु कन्येला शुभ होय. प्रथम, तृतीय, षष्ठ, आणि दशम या स्थानाचा गुरु पूजाहोमरूप शांति केल्याने शुभ होतो. चतुर्थ, अष्टम आणि द्वादश या स्थानचा गुरु दुष्ट फल देणारा असतो. कर्क, धनु व मीन या राशींचा गुरु चतुर्थ इत्यादि स्थानचा असला तरी दुष्ट नाही. संकट असेल तेव्हा चतुर्थ व द्वादश स्थानचा गुरु दुप्पट होमादिरूप पूजा केल्याने आणि अष्टम स्थानचा तिप्पट होमादिरूप पूजा केल्याने शुभ होतो. वराच्या राशीपासून तृतीय, षष्ठ, दशम आणि एकादश स्थानचा रवि शुभ होय. इतर स्थानचा ग्रहमखात सांगितलेली पूजा केल्याने शुभ होतो. गुरूच्या पूजेचा प्रकार उपनयनप्रकरणामध्ये सांगितला आहे.