मूळ नक्षत्राच्या पहिल्या तीन चरणात जन्म पावलेली वधु व वर आपल्या श्वशुराचा नाश करितात. आश्लेषा नक्षत्राच्या शेवटच्या तीन चरणात जन्म असेल तर सास्वेचा नाश करतात. ज्येष्ठा नक्षत्राच्या शेवटच्या चरणात जन्म असेल तर परस्परांच्या ज्येष्ठ भ्रात्याचा नाश करतात. विशाखा नक्षत्राच्या शेवटच्या चरणी जन्म असेल तर परस्परांच्या कनिष्ठ भ्रात्याचा नाश करतात. मघा नक्षत्राच्या पहिल्या चरण जन्म असता मूळ नक्षत्राप्रमाणेच फळ जाणावे असे कोणी ग्रंथकार म्हणतात. दुसरे ग्रंथकार, उपनयन म्हणजे दुसरा जन्मच आहे करिता त्याच्या पूर्वीचा पहिला जन्म मूळ नक्षत्रावर झाल्यामुळे वर श्वशुराचा घात करतो वगैरे दोष नाही असा अपवाद संकटाचे वेळी जाणावा असे म्हणतात. श्वशुर इत्यादि नसेल तर वधूला दोष नाही. आस्वल, वृक्ष, नदी या नावाची; चांडाल, पर्वत या नावाची पक्षी, सर्प, दास या नावाची, भयंकर नावाची कन्या वरू नये. वराचे पुरुषत्वाची परीक्षा करून त्याला कन्या द्यावी. 'ज्याचे रेत पाण्यात तरते व मूत्र सशब्द व फेसयुक्त असते इत्यादि पुरुषत्वाची परीक्षा जाणावी. कुल, स्वभाव, शरीरसौंदर्य, विद्या, वित्त व सनाथत्व हे सात गुण पाहून शहाण्यांनी वराला कन्या द्यावी. याहून जास्त पहाण्याचे कारण नाही. याप्रमाणे वधू व वर यांच्या मूळ नक्षत्रावरील जन्मासंबंधाचा विचार सांगितला.