यानंतर ज्योतिषी याने सांगितलेल्या शुभ काली, एक हात मध्ये जागा सोडून पूर्वेकडे एक व पश्चिमेकडे एक अशा तांदुळाच्या दोन राशी करून पूर्वेकडच्या राशीवर पश्चिमाभिमुख वर व पश्चिमेकडच्या राशीवर पूर्वाभिमुख कन्या याप्रमाणे उभी करून त्या दोघांच्या मध्ये कुंकुमादिकांनी काढलेले स्वस्तिक इत्यादिकांनि अलंकृत असा उत्तरेकडे दशा केलेला अंतरपट धरावा. कन्या व वर यांचा पिता इत्यादिकांनी ज्योतिष्याची पूजा करून त्याने दिलेल्या अक्षता फळासह कन्या व वर यांच्या अंजलीमध्ये द्याव्या. वधू व वर यांनी हातात अक्षता घेऊन अंतरपटावरील स्वस्तिकाकडे पहात
अमुकदेवतायै नमः’ याप्रमाणे आपल्या कुलदेवतेचे ध्यान करीत उभे रहावे. मंगळाष्टके म्हटल्यावर ज्योतिषी याने आपण सांगितलेल्या मुहूर्तावर ’तदेव लग्नं०’ हे वाक्य म्हणून "सुमुहूर्त मस्तु ॐ प्रतिष्ठ०" असे म्हटल्यावर अंतरपट उत्तरेच्या बाजूला घ्यावा. नंतर वधूवरांनी परस्परांच्या मस्तकावर अक्षता टाकून परस्परांना अवलोकन करावे. वराने वधूच्या भ्रुकुटीच्या मध्यभागी दर्भाग्राने "ॐ भूर्भूवस्वः" या मंत्राने रेषा काढून दर्भ टाकून उदकाला स्पर्श करावा. वदिक ब्राह्मणांनी पठन करावयाची जी ब्राह्मणाच्या खंडातील वाक्ये ती म्हटल्यानंतर प्रत्येक वाक्याच्या शेवटी कन्येने वराच्या मस्तकावर अक्षता टाकाव्या व वराने कन्येच्या मस्तकावर अक्षता टाकाव्या. नंतर वराला पूर्वाभिमुख व कन्येला पश्चिमाभिमुख बसवून कन्या देणाराने दक्षिणेस सपत्नीक बसावे व वराने दिलेल्या अलंकारांनी विरहित, नूतन वस्त्र धारण केलेली, स्वथ द्यावयाच्या अलंकारांनी युक्त, कनकाने युक्त जिची अंजलि आहे अशी व वराची पूजा करून शेष राहिलेल्या गंधाने जिचे हस्त व पाद लिप्त आहेत अशी कन्या दान करावी. तो प्रकार असा हातात दर्भ घेऊन देशकालादिकांचा उच्चार करून
"अमुक प्रवरामुकगोत्रोमुकशर्माहं मम समस्त पितृणांनिरति शयानंदब्रह्मलोकाव्याप्तयादिकन्यादानकल्पोक्तफलावाप्तये अनेन वरेणास्या कन्यायामुत्पादयिष्यमाण संतत्या द्वादशावरान द्वादशपरान पुरुषांश्च पवित्रीकर्तु मात्मनश्च श्रीलक्ष्मीनारायणप्रीतये ब्राह्मविवाहविधिना कन्यादानं करिष्ये"
याप्रमाणे दर्भ, अक्षता, उदक यांनी संकल्प करावा. नंतर उभे राहून कन्येला घेऊन
"कन्या कनकसंपन्ना कनकाभरणैर्युताम । दास्यामि विष्णवे तुभ्यं ब्रह्मलोकजिगीषया ॥ विश्वंभरः सर्वभूतः साक्षिण्यः सर्वदेवताः । इमां कन्या प्रदास्यामि पितृणा तारणाय च ॥
असे मंत्र म्हणून कास्यपात्रामध्ये कन्येच्या अंजलीवर वराची अंजलि ठेवून, पत्नीने संततधार धरलेले शुद्धोदक वराच्या हिरण्ययुक्त हस्तावर सोडावे.
"कन्या तारयौ । पुण्यंवर्धयतु । शान्तिः पुष्टिस्तुष्टिश्चास्तु । पुण्याहं भवन्तो ब्रुवन्तु ।"
ही चार वाक्ये उच्चारल्यानंतर
"अमुक प्रवरामुकगोत्रोमुकशर्माहं मम समस्त० इत्यादि प्रीतये"
येथपर्यंत वाक्य उच्चारून
"अमुकप्रवरोपेतामुकगोत्रोमुकशर्मणः प्रपौत्रायामुकशर्मणः पौत्रायामुकशर्मणः पुत्रायामुकशर्मणे श्रीधररूपिणे वराय ।
अमुकप्रवरामुकगोत्रामुकशर्मणः प्रपौत्री अमुकशर्मणः पौत्री अमुकशर्मणः मम पुत्री अमुकनाम्नी कन्या श्रीरूपिणी प्रजापति दैवत्या प्रजोत्पादनार्थ तुभ्यमहं संप्रददे"
असे म्हणून वराच्या सहिरण्य हस्तावर अक्षतांसह उदक सोडावे आणि
"प्रजापतिः प्रीयतां कन्या प्रतिगृह्णातु भवान"
असे म्हणावे. याप्रमाणे त्रिवार ’कन्या तारयतु’ इत्यादि वाक्ये म्हणून कन्यादान करावे. वराने "ॐस्वस्ति" असे म्हणून कन्येच्या उजव्या खांद्याला स्पर्श करून
"क इदं कस्मा अदात० पृथिवी प्रतिगृह्णातु०"
हा मंत्र तीन वेळा म्हणून
’धर्मप्रजासिद्ध्यर्थं प्रतिगृह्णामि" असे म्हणावे. कन्यादान करणाराने
"गौरी कन्यामिमां विप्र यथाशक्तिविभूषिताम ।
गोत्राय शर्मणे तुभ्यं दत्ता विप्र समाश्रय ॥
कन्ये ममाग्रतो भूयाः कन्ये मे देवि पार्श्व्योः ।
कन्ये मे पृष्ठतो भूयास्त्वद्दानान्मोक्षमाप्नुयाम ॥
मम वंशकुले जाता पालिता वत्सराष्टकम ।
तुभ्यं विप्र मया दत्ता पुत्रपौत्रप्रवर्धिनी ॥
धर्मे चार्थेच कामेच नातिचरितव्या त्वयेयम ॥
अशी वाक्ये म्हणावी
नंतर वराने "नातिचरामि" असे म्हणावे. नंतर दान करणाराने बसावे व
"कन्यादानप्रतिष्ठासिद्ध्यर्थं इदं सुवर्णमग्निदैवत्यं दक्षिणात्वेन संप्रददे "
असे म्हणून वराला सुवर्णदक्षिणा द्यावी. वराने "ॐ स्वस्ति" असे म्हणावे. त्यानंतर भोजनपात्रे, जलपात्रे, इत्यादिक दान करावे. पितामह कर्ता असेल तर ’पौत्री’ शब्दाच्या पूर्वी ’मम’ म्हणावे व ’पुत्री’ शब्दाचे पूर्वी मम म्हणू नये. भ्राता कर्ता असेल तर पूर्वीप्रमाणे तीन पुरुषांची नुसती नावे म्हणावी, ’मम’ शब्द कोणाच्याच पूर्वी उच्चारू नये. प्रपितामह कर्ता असेल तर "प्रपौत्री’ शब्दापूर्वी ’मम’ म्हणावे. मातुल इत्यादिक अन्य कर्ता असेल तर त्याने आपले गोत्र आपल्या नावांसह उच्चारून
"अमुकशर्मणः समस्तिपितृणां" असे कन्येच्या पित्याचे नाव षष्ठ्यन्त उच्चारावे व कन्येच्या
"अमुकशर्मणः समस्तपितृणा" असे कन्येच्या पित्याचे नाव षष्ठ्यन्त उच्चारावे व कन्येच्या विशेषणासहित तिच्या पित्याचे गोत्र वगैरे उच्चारावे. "मम वंशकुले जाता" यामध्ये ’मम’ शब्दाचे ऐवजी पित्याचे षष्यठन्त नाव म्हणावे. दत्तक कन्येचे दान असेल तर पिता इत्यादिकाने ’मम वंशकुले जाता’ याऐवजी ’मम वंशकुले दत्ता’ इत्यादि म्हणावे.