ब्राह्म, दैव, आर्ष, प्राजापत्य, आसुर, गांधर्व, राक्षस आणि पैशाच असे विवाहाचे आठ भेद आहेत. योग्य वराला आमंत्रण करून त्याला अलंकार देऊन कन्यादानाचे विधीने कन्या देणे हा ब्राह्म विवाह. यज्ञामध्ये ऋत्विजाचे काम करणाराला अलंकारयुक्त कन्या अर्पण करणे हा दैव विवाह. वरापासून एक अथवा दोन गोमिथुन (गाय व बैल) घेऊन त्याला कन्या अर्पण करणे हा आर्षविवाह. हे गोमिथुन घेणे निंद्य नाही. ते कन्येच्या पूजेकरिता घ्यावयाचे असल्यामुळे त्याने कन्याविक्रय केला असे होत नाही. "तू हिच्यासह गृहस्थाश्रम धर्माचे आचरण करावे व ही जिवंत असेपर्यंत दुसरा विवाह अथवा संन्यसग्रहण करू नये असे सांगून कन्यादान करणे हा प्राजापत्य विवाह. ज्ञातीला यथेच्छ धन देऊन विवाह करणे तो आसुर विवाह. वर व वधू यांच्या इच्छेने परस्पर संबंध होणे तो गांधर्व विवाह. युद्धादिकात बलाने कन्येचे हरण करणे तो राक्षसविवाह. चोरी करून कन्येचे हरण करणे तो पैशाच विवाह. पहिल्या चोहोमध्ये दुसर्याहून पहिला श्रेष्ठ होय. म्हणजे प्राजाप्त्यापेक्षा आर्ष श्रेष्ठ, आर्षाहून दैव श्रेष्ठ व दैवाहून ब्राह्म श्रेष्ठ. दुसर्या चोहोमध्ये पहिल्याहून दुसरा निंद्य. यामध्ये ब्राह्मणाला ब्राह्म व दैव विवाह प्रशस्त, क्षत्रियाला गांधर्व व राक्षस प्रशस्त, वैश्याला आसुर प्रशस्त आणि आर्श, प्राजापत्य व पैशाच हे सर्वांना प्रशस्त. संकट असेल तर ब्राह्मणाने राक्षस खेरीज करून इतर सातापैकी कोणताही विवाह करावा, क्षत्रियाने ब्राह्म व दैव खेरीज करून इतर सहापैकि कोणताही विवाह करावा आणि वैश्य व शूद्र याने ब्राह्म, दैव व राक्षस खेरीज करून इतर पाचापैकी कोणताही विवाह करावा. सर्व विवाहांमध्ये त्या त्या प्रकाराने कन्या परिग्रह झाल्यानंतर आपापल्या गृह्यसूत्राच्या रीतीप्रमाणे विवाह होम वगैरे विधि आवश्यक आहे. केवळ दानविधि केल्याने सर्वत्र दान होत नाही, पैशाच वगैरे विवाहांमध्ये सप्तपदी होण्याचे पूर्वी कन्या दुसर्यास देता येते. ब्राह्म वगैरे विवाहामध्ये देखील कन्यादान केल्यानंतरही सप्तपदी झाली नसेल तर वराला षंढत्व इत्यादि दोष आहे असे ज्ञान झाल्यास अथवा वर मरण पावल्यास कन्या दुसर्याला द्यावी. ब्राह्म विवाहाने वरलेल्या स्त्रीचे ठिकाणी जन्मलेला पुत्र पूर्वीचे दहा व पुढचे दहा अशा वीस पितरांना तारतो. देव विवाहाने वरलेल्या स्त्रीचा पुत्र सात सात पुरुषांना, प्राजापत्य विवाहाने वरलेल्या स्त्रिचा पुत्र सहा सहा आणि आर्ष विवाहाने वरलेल्या स्त्रीचा पुत्र तीन तीन पुरुषांना तारतो. अश्वलायन सूत्रामध्ये तर ब्राह्म वगैरे विवाहांनी वरलेल्या स्त्रीचा पुत्र अनुक्रमे बारा, दहा, आठ व सात अशा पूर्वीच्या व पुढच्या पुरुषांना तारतो असे सांगितले आहे. इतर चार दुर्विवाहाने वरलेल्या स्त्रीचे पुत्र ब्राह्मण धर्माचा द्वेष करणारे होतात. वाग्दान झाल्यानंतर वर देशांतराला गेला असल्यास सहा महिनेपर्यंत वाट पाहून कन्या दुसर्या वराला द्यावी. कन्येचे शुल्क देऊन गेला असेल तर एक वर्शपर्यंत वाट पहावी. 'बलात्काराने विवाह केला असल्यास अथवा सगोत्रत्व, क्लीबत्व इत्यादि दोष वराचे ठिकाणी आढळल्यास सप्तपदी विधि झालेला असेल तथापि कन्या दुसर्या वराला द्यावी' असे जे वचन आहे ते कलियुगामध्ये निषिद्ध आहे. वाग्दानानंतर पातित्य वगैरे दोष नसताना कन्येचा दाता कन्या न देईल तर त्याला दंड सांगितला आहे. याप्रमाणे कन्येला अपस्मार वगैरे दोष असलेला लपवून ठेवून कन्या देणाराही दंडास पात्र आहे. असे सांगितले आहे. अधर्म्य विवाहामध्ये ब्राह्मणांनी भोजन वगैरे केले असेल तर, आसुर विवाहामध्ये एक रात्र उपवास, गांधर्व विवाहामध्ये तीन दिवस उपवास आणि पैशाच विवाहामध्ये चांद्रायण प्रायश्चित्त याप्रमाणे प्रायश्चित्त सांगितले आहे. याप्रमाणे विवाहाचे प्रकार सांगितले.