वर व वधू या दोघांनाही चंद्रबल व ताराबल अवश्य पहावे. दोघांपैकी एकाला चंद्रबलाचा अभाव असेल तर रुपे इत्यादिकांचे दान करावे. मेष राशीचा पहिला, वृषभ राशीचा ५ वा, मिथुन राशीचा नववा, कर्क राशीचा दुसरा, सिंह राशीचा ६ वा कन्या राशीचा १० वा, तूळ राशीचा ३ रा वृश्चिक राशीचा ७ वा, धन राशीचा ४ था, मकर राशीचा ८ वा, कुंभ राशीचा ११ वा आणि मीन राशीचा १२ वा या प्रमाणे घात चंद्र आहेत. यात्रा, शुद्ध याविषयी घातचंद्र वर्ज्य करावा. विवाह, सर्व मंगल कार्ये, चौलादि, व्रतबंध, यज्ञ सीमंतोन्नयन व जातकर्म या सर्वांना घातचंद्र पाहू नये. मृत्युयोग, परिघाचे पुर्वार्ध, भद्रा, व्यतीपात वैधृति, निष्कंभादि योगाचे दुष्ट भाग, तिथिवृद्धि, यामार्ध, कुलिकादिक, गंडान्त, रवि संक्रमण, धूमकेतूचा उदय, धरणीकंप इत्यादि असता विवाह वर्ज्य करावा. ग्रहणाचा एकपाद ग्रास असेल तर तीन दिवस, दोन पाद ग्रास असेल तर चार दिवस, तीन पाद ग्रास असेल तर सहा दिवस आणि चार पाद ग्रास असेल तर आठ दिवस याप्रमाणे ग्रहणाच्या पूर्वी अर्धे व पुढे अर्धे याप्रमाणे वर्ज्य करावे. भूकंप व उल्कापात असता तीन दिवस, वज्रपात झाल्यास एक दिवस वर्ज्य करावा. धूमकेतु जोपर्यंत उदित असेल तोपर्यंत अशुभ काल होय. याविषयी अपवाद... 'नांदीश्राध केल्यानंतर भूकंप वगैरे झाल्यास दोष नाही.' दिवसास विवाह करणे प्रशस्त होय. रात्री देखील कन्यादान करणे प्रशस्त आहे असे हेमाद्रीचे मत आहे.