कूश्मांडहोम इत्यादिकाने शुद्धि करून जननाशौच व मृताशौच यामध्ये आरंभ केलेल्या विवाहादिकात पूर्वी तयार करून ठेवलेले अन्न ब्राह्मणांनी भक्षण करण्यास दोष नाही. पात्रांवर पदार्थ वाढायाचे ते देखील आशौची यांनी वाढावे, कारण होमादि विधि केल्यामुळे त्यांना शुद्धि असते असे कौस्तुभात सांगितले आहे. पण हे योग्य नाही; कारण हे लोकात निंदास्पद होते. परगोत्रातल्या माणसांनीच अन्न वाढावे हे योग्य दिसते. नांदीश्राद्ध केल्यानंतर मृताशौच अथवा जननाशौच प्राप्त होईल तर पूर्वी अन्न तयार केलेले नसले तरी विवाहानंतर तयार केलेल्या अन्नाचे ब्राह्मणांनी भोजन कराए. या प्रसंगी देखील "परगोत्रातील माणसांनी अन्न वाढावे व ब्राह्मणांनी भोजन करावे." हे सर्व संमत आहे. पर म्हणजे परगोत्री असा निर्णयसिंधु, मयूख आदि ग्रंथात अर्थ दिला आहे. पूर्वी तयार केलेल्या अन्नाचे भोजन करीत असता सूतक प्राप्त होईल तर भोजन करणार्यांनी बाकी राहिलेले अन्न टाकून दुसर्याच्या घरातील उदकाने आचवावे. पाक केल्यापैकी शिल्लक राहिलेले अन्न सूतकी असतील त्यांनी भक्षण करावे. कारण, "ब्राह्मण भोजन करीत असता मध्यंतरी मृताशौच प्राप्त झाल्यास दुसर्याच्या गृहातील उदकाने आचवावे" असे स्मृतिवचन आहे. नांदीश्राद्ध केल्यानंतर भोजनाखेरीज अन्य समयी सूतक प्राप्त होईल तर सूतकी यांच्या घरी भोजन करावे. भोजन करीत असता सूतक प्राप्त होईल तर मात्र पात्रात असलेले देखील अन्न टाकावे असा जो निर्णय आहे तो केवळ वाचनीक आहे. आणि वाचनीक निर्णयाचे महत्व विशेष नाही असा न्याय आहे. मला तर, "ब्राह्मण भोजन करीत असता मध्यंतरी मृताशौच प्राप्त झाल्यास दुसर्याच्या गृहातील उदकाने आचवावे" हे वाक्य आरंभ केलेल्या अथवा आरंभ न केलेल्या सर्व कर्मामध्ये पूर्वी तयार न झालेल्या अन्नासंबंधाने आहे असे वाटते. याप्रमाणे विवाह इत्यादिकामध्ये रजोदर्शन, सूतक प्राप्त झाली असता त्यासंबंधी निर्णय सांगितला.