विवाहाचा निश्चय झाल्यानंतर वराच्या अथवा वधूच्या सगोत्रांपैकी त्रिपुरुषकुळामध्ये कोणी मरण पावल्यास प्रतिकूलदोष होतो. या ठिकाणी विवाहाचा निश्चय वैदिक अथवा लौकिक समजावा. त्यामध्ये वाग्दान नामक विधीने केलेला तो वैदिक. त्यामध्ये वाग्दान नामक विधीने केलेला तो वैदिक. हाच मुख्य निश्चल होय. लग्नाच्या तिथीचा निश्चय वगैरे, वर व वधू यांना अलंकारादि देण्याविषयी परस्पर भाषाबंध, सुपारी देणे वगैरे, हा लौकिक निश्चय होय. 'सगोत्रांचे त्रिपुरुष कुल' या शब्दांनी मातामहाच्या कुलाची व्यावृत्ति झाली. त्रिपुरुष कुलाचे प्रकार - वर, त्याची पूर्वीची पत्नी, वराची माता, पिता, पितामह, पितामही आणि लग्न न झालेली पित्याची बहीण ही पूर्व त्रिपुरुषी होय. वर, त्याचा भ्राता, भ्रातुपत्नी, भ्रातृपुत्र, विवाह न झालेली भ्रात्याची कन्या, विवाह न झालेली वराची बहीण, वराचा सून, पुत्र, विवाह न झालेली कन्या, नातू, नातवाची पत्नी, विवाह न झालेली नात ही परत्रिपुरुषी होय. वराचा चुलता, चुलती, चुलत्याचा पुत्र व चुलत्याचे पुत्राची पत्नी व विवाह न झालेली चुलत्याची कन्या, आणि संतानभेद असेल तर ती त्रिपुरुषी याप्रमाणे सगोत्र त्रिपुरुषीची गणना जाणावी. यापैकी एखाद्याला मृत्यु प्राप्त झाल्यास प्रतिकूल होय. असा अर्थ समजावा. या ठिकाणी भ्राता, पुत्र, पौत्र हे उपनयन झालेले नसले तथापि तीन वर्षाहून अधिक वयाचे असतील ते घ्यावे. याप्रमाणे विवाह न झालेली बहीण इत्यादिकांसंबंधाने देखील तीन वर्षांची इयत्ता घ्यावी हे योग्य दिसते. याप्रमाणे वधुकुलांतील त्रिपुरुषीसंबंधाने जाणावे. मंडन मुंडन इत्यादिकांमध्येही अशीच त्रिपुरुषगणना समजावी.