विवाहादिकांस आरंभ करण्याच्या अगोदर अथवा आरंभ केल्यानंतर वराचे अथवा वधूचे मातेला किंवा चुलता इत्यादि कर्ता असल्यास त्याचे पत्नीला रजोदर्शन होईल तर काय करावे यासंबंधाचा निर्णय उपनयनाचे प्रकरणांत विस्ताराने सांगितला आहे तोच विवाहासंबंधी जाणावा. रजोदर्शन जननाशौच इत्यादिकांचा संभव असेल तर नांदीश्राद्ध अपकर्षाने पूर्वी केले असता किती दिवसपर्यंत रहाते ते सांगतो- "यज्ञासंबंधी एकवीस दिवस, विवाहासंबंधी दहा दिवस,चौल व उपनयन यांचेसंबंधी अनुक्रमे तीन व सहा दिवस याप्रमाणे नान्दीश्राद्ध करावे." दहा दिवस इत्यादि जी संख्या सांगितली तिचा अतिक्रम झाल्यास पुन्हा नान्दीश्राद्ध केले पाहिजे हे अर्थात सिद्ध होते. नान्दीश्राद्धानंतर जननाशौच अथवा मृताशौच प्राप्त होईल तर विवाह इत्यादिकांना प्रतिबंध नाही. कारण "विवाह, व्रत, यज्ञ, श्राद्ध, होम, अर्चन, जप यांना आरंभ केल्यानंतर सुतक नाही; आरंभ करण्याच्या पूर्वी सूतक आहे. यज्ञामध्ये प्रारंभ म्हणजे ऋत्विजाचे, वरण, व्रत, व सत्र यामध्ये प्रारंभ म्हणजे त्यांचा संकल्प करणे, विवाह इत्यादिकांमध्ये प्रारंभ म्हणजे नान्दीश्राद्ध आणि श्राद्धामध्ये प्रारंभ म्हणजे पाकपरिक्रिया होय." असे वचन आहे. हा निर्णय जवळ दुसरा मुहूर्त मिळत नसल्यामुळे संकट असेल तरच जाणावे. संकट नसेल तर नान्दीश्राद्ध झाले असता देखील सूतक संपल्यानंतरच दुसर्या मुहूर्तावर मंगल कार्य करावे. "अशौचासंबंधी सांगितलेले सर्व अपवाद दुसरा मार्ग नसेल व आपत्ति असेल तरच जाणावे" असे निर्णयसिंधूमध्ये सांगितले आहे. यावरून व्रताचे संबंधाने संकल्प झाल्यानंतर आशौच प्राप्त झाल्यास ब्राह्मणाकडूनच पूजा वगैरे करवावी. यज्ञादिकांमध्ये मधुपर्क विधीने ऋत्विजाचे वरण झाल्यानंतर, दुसरा रुत्विज मिळत नाही इत्यादि अनन्यगतिरूप संकट असेल तरच मधुपर्क विधीने पसंत केलेल्या ऋत्विजाला अशौच नाही. याप्रमाणे जप, होम इत्यादिकांसंबंधानेही जाणावे. श्राद्धामध्ये पाकपरिक्रिया म्हणून वर सांगितली त्यामध्ये पाकपरिक्रिया म्हणजे पाकाचे प्रोक्षण. हे देखील संकट असेल तरच समजावे. महासंकट असेल तर प्रारंभाचे पूर्वी देखील सूतक आले असता कूष्मांड मंत्रांनी घृताचा होम करून दुग्धवती गाईचे दान करून पंचगव्य प्राशन करून शुद्ध झाल्यावर चूडाकर्म, उपनयन, विवाह, प्रतिष्ठा इत्यादि करावी. जवळ दुसरा मुहूर्त नसल्यामुळे तयार केलेल्या सामुग्रीचा नाश होण्याची आपत्ति असेल तेव्हा देखील याप्रमाणेच शुद्धि जाणावी. हा सर्व निर्णय जननाशौचासंबंधानेच आहे असे मार्तंड वगैरे ग्रंथात सांगितले आहे.