माघ, फाल्गुन, वैशाख हे मास आणि शुक्लपक्ष शुभ सांगितला आहे, अश्विनी, रोहिणी, पुनर्वसु, पुष्य, तीन उत्तरा, अनुराधा, ज्येष्ठा, हस्त, स्वाति, चित्रा, श्रवण व शततारका ही नक्षत्रे; चंद्र, बुध, गुरु, शुक्र, हे वार; ही द्वितीय वधूप्रवेशाला शुभ आहेत. गुरुशुक्रांचा अस्त वर्ज्य करावा, स्थिर लग्न वगैरे शुभ काल घ्यावा. द्विरागमनाविषयी, अधिकमास, विष्णुशयनास (आषाढ शुक्ल एकादशीपासून कार्तिक शुक्ल द्वादशीपर्यंत चार महिने) सम वर्षे, प्रतिशुक्रादि दोश अथवा अस्तादिकांचा दोष नाही "विवाहापासून सोळा दिवसांमध्ये अकरावे दिवशी व सम दिवशी द्विरागमन करण्याविषयी नक्षत्र, तिथि, योग, वार इत्यादिकांची शुद्धि पहाण्याचे कारण नाही." केवलांगिरस, केवलभृगु, भरद्वाज, भरणी व कृत्तिकांचा पहिला चरण यांचे ठिकाणी चंद्र असता शुक्राला अंधत्व असते. करिता त्या वेळी प्रतिशुक्र दोष नाही. दुर्भिक्ष, देशविप्लव, विवाह, तीर्थगमन, एक नगर अथवा एक ग्राम याविषयी प्रतिशुक्रदोष नाही. याप्रमाणे द्विरागमनाविषयी निर्णय सांगितला.