वडील भ्राता असताना त्याचे अगोदर जो विवाह व अग्निहोत्र धारण करतो त्याला परिवेत्ता म्हणतात व ज्येष्ठ भ्रात्याला परिवृत्ति म्हणतात याप्रमाणे ज्येष्ठ कन्येचा विवाह होण्याच्या अगोदर कनिष्ठ कन्येचा विवाह केला तर ज्येष्ठ कन्येला दिधिषु आणि कनिष्ठ कयेला अग्रेदिधिषु संज्ञा आहेत. याविषयी प्रायश्चित्त-पिता इत्यादिकाने दिलेल्या कन्येशी अज्ञाने करून विवाह झाला तर परिवेत्ता व परिवित्ति या दोघा भ्रात्यांनी दोन कृच्छ्र प्रायश्चित्त करावे कन्येने एक कृच्छ्र करावे, कन्यादान करणाराने अतिकृच्छ्र करावे व उपाध्यायाने चांद्रायण करावे. पिता इत्यादिकाने दिलेल्या कन्येशी जाणून विवाह होईल तर सर्वांनी एक वर्षपर्यंत कृच्छ्र प्रायश्चित्त करावे पिता इत्यादिकाने आपल्या इच्छेने कन्या दिली असेल तर तीन महिने कृच्छ्र प्रायश्चित्त करावे. पित्याने दिली नसून अज्ञाने करून विवाह झाला असता चांद्रायण इत्यादि प्रायश्चित्त करावे. दिधिषूच्या पतीने अतिकृच्छ्र व अग्रेदिधिषूच्या पतीने कृच्छ्र प्रायश्चित्त करावे. याविषयी अपवाद. ज्येष्ठ भ्राता सावत्र अगर दत्तक असेल तर कनिष्ठाला विवाह व अग्निहोत्र याविषयी दोष नाही. सोदर ज्येष्ठ भ्राता असताही तो जर क्लीब, मुका, बहिरा, खुजा, पंगू, परदेशी वास करणारा, वेश्यासक्त, बाटलेला, महारोगी, अतिवृद्ध, कृषीचे ठिकाणी असक्त, धनवृद्धि, राजाची नोकरी इत्यादि व्यापारामध्ये आसक्त, चौर्यकर्मामध्ये आसक्त, वेड लागलेला अथवा विवाह व अग्निहोत्र या विषयी निरीच्छ असा असेल तर कनिष्ठाला विवाह करण्यास व अग्निहोत्र घेण्यास दोष नाही. देशांतरी गेलेल्या ज्येष्ठ भ्रात्याकरिता कनिष्ठाने आठ अथवा बारा वर्षे पर्यंत वाट पहावी. या प्रमाणे ज्येष्ठ कन्या सापत्न असेल तर कनिष्ठ कन्येचा विवाह करण्यास दोष नाही. तसे ज्येष्ठ कन्या मुकी इत्यादि दोषयुक्त असेल तरी कनिष्ठ कन्येचा विवाह करण्यास दोष नाही. या प्रमाणे परिवेत्ता इत्यादिकासंबंधी निर्णय सांगितला.