वराचा पिता इत्यादिक आपली पत्नी व संस्कार्य (ज्याचा विवाह करावयाचा तो) यांच्या सह अभ्यंगस्नान केलेला व नुतन वस्त्र परिधान केलेला पूर्वाभिमुख असा बसून उजव्या बाजूला आपल्या पत्नीला बसवावे व तिच्या उजव्या बाजूला संस्कार्याने बसावे. नंतर देशकालादिकांचा उच्चार करून
"ममास्य पुत्रस्य दैवपित्र्यऋणापाकरणेहेतुधर्मप्रजोत्पादनसिद्धिद्वारा श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थ विवाहासंख्यं संस्कारकर्म करिष्ये, तदंगत्वेन स्वस्तिवाचनं मातृकापूजनं नान्दीश्राद्धं नान्दिन्यामण्डपदेवतास्थापनं च करिष्ये, तदादौ निर्विघ्नतासिद्ध्यर्थ गणपतिपूजां करिष्ये"
याप्रमाणे पुत्राच्या विवाहाचा संकल्प करावा. कन्येचा विवाह असेल व जातकर्मादि संस्कारांचा लोप झाला असेल तर
"ममास्याः कन्यायाः जातकर्मनामकर्मसूर्यावलोकननिष्क्रमणोपवेशनान्नप्राशनचौलसंस्काराणां बुद्धिपूर्वकलोपजन्यप्रत्यवायपरिहारार्थं प्रतिसंस्कारमर्धकृच्छ्रंचूडायाःकृच्छ्रं तत्प्रत्याम्नायगोनिष्क्रयाभूतयथाशक्तिरजतद्रव्यदानेनाहमाचारिष्ये"
असा संकल्प करावा. आपले गर्भाधान, सिमन्तोन्नयन यांचा लोप झाला असेल तर त्यांचाही संकल्पामध्ये उच्चार करावा. नंतर
"ममास्याः कन्यायाः भर्त्रासह धर्मप्रजोप्तादनद्रव्यप्रिग्रहधर्माचरणेष्वधिकारसिद्धिद्वारा श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थ विवाहसंस्कार करिष्ये
असा संकल्पामध्ये विशेष जाणावा. बाकी प्रयोग पूर्वी प्रमाणे करावा. कर्ता संस्कार्याचा भ्राता असेल तर त्याने
"मम भ्रातुः" अथवा "मम भगिन्याः"
असे म्हणावे. चुलता इत्यादिक असेल तर त्याने
"मम भ्रातुसुतस्य"
अथवा
"भ्रातृकन्यायाः"
असे म्हणावे. वर व वधू यांच्या स्वतःकडेच कर्तृत्व असेल तर
"मम दैवपित्र्यऋण०" व "मम भर्त्रा सह०"
इत्यादि संकल्प म्हणावा. स्वस्तिवाचन अथवा कन्यादान या प्रसंगी मुख्य विवाह संस्काराचा संकल्प करू नये. असे कोणी ग्रंथकार म्हणतात पण ही त्यांची चूक आहे असे बहुत ग्रंथकारांचे मत आहे. कन्यादान, विवाहहोम यांचा संकल्प हाच मुख्य संकल्प त्यावाचून विवाह हे नावच संस्काराला येत नाही असे दुसरे ग्रंथकार म्हणतात. मातृकापूजन झाल्यानंतर वरपिता अथवा वधूपिता याने आपला पिता, माता, मातामह वगैरे मृत झाले असतील तर तीन पार्वणांनी युक्त असे नांदीश्राद्ध केले पाहिजे. माता जिवंत असेल तर भातृपार्वणाचा लोप करावा. मातामह जिवंत असेल तर मातामहपार्वणाचा लोप करावा. याप्रमाणे माता अथवा मातामह यापैकी एक जिवंत असेल तर त्याच्या पार्वणाचा लोप करून बाकी दोन पार्वणे केल्याने नान्दीश्राद्धाची सिद्धि होते. माता व मातामह दोघेही जिवंत असतील तर केवळ पितृपार्वण करावे. पिता व प्रपितामह मृत असून पितामह जिवंत असेल तर पिता, प्रपितामह व प्रपितामहाचा पिता यांच्या उद्देशाने पितृपार्वण करावे. याप्रसंगी
"पितृ प्रपितामहत्पितरो नान्दिमुखा इदं वः पाद्यम"
इत्यादि प्रयोग करावा. प्रपितामह मात्र जिवंत असेल तर पिता, पितामह व पितामहाचा प्तामह यांच्या उद्देशाने पितृपार्वण करावे. पिता मृत असून पितामह व प्रपितामह जिवंत असतील तर प्तिआ, पितामहाचा पितामह व पितामहाचा प्रपितामह यांच्या उद्देशाने पितृपार्वण करावे व तसा उच्चार म्हणावा. याप्रमाणे माता मृत असून पितामही मात्र जिवंत असेल तर
"मातः पितः पितामही प्रतितामह्यौच पितु प्रपितामही च नान्दीमुखाः"
असा उच्चार करावा. पितामही व प्रपितामही जिवंत असतील तर
"मातः पितामहस्य पितामही प्रपितामह्यौ च"
इत्यादि उच्चार करावा. मुख्य माता जिवंत असेल व सापत्न माता मृत असेल तर मातृपार्वण नाही. याप्रमाणे मुख्य पितामही जिवंत असून पितामहीची सवत मृत असेल तर त्या सवतीच्या सह मातृपार्वण करू नये, पूर्वी सांगितलेलाच उच्चार करावा. याप्रमाणे प्रपितामह्च्या सवतीविषयीही जाणावे. तसेच मुख्य मातामही जिवंत असून तिची सवत इत्यादि मृत झाली असेल तथापि मातामह वगैरेंचा सपत्नीक उच्चार करू नये, केवल त्यांच्याच नावाचा उच्चार करावा. कारण दर्शादि श्राद्धाविषयीही माता जिवंत असून सापत्न माता मुत असेल तर पिता इत्यादिकांचाच केवळ उच्चार करावा असा सिद्धांत आहे.