स्वतःचा दुसरा विवाह, समावर्तन, आधान, इत्यादि संस्कारांमध्ये जीवत्पितृक असेल त्याने आपल्या पित्याचा पिता इत्यादिकांच्या उद्देशाने तीन पार्वणे करावी. त्यामध्ये
"पितुर्मातृपितामही प्रपितामह्यः पितुः पित्रुपितामहप्रपितामहाः पितुर्मातामह मातुः पितामहमातुःप्रपितामहहाः नान्दीमुखाः"
असा उच्चार करावा. या ठिकाणी पित्याची माता वगैरे जिवंत असतील तर तेवढ्या पार्वणाचा लोप करावा. मृतपितृक असेल तर आपला पिता इत्यादिकांच्या उद्देशाने नांदीश्राद्ध करावे, याविषयी संशय नाही. पिता व पितामह जिवंत असतील तर पितामहाची माता वगैरे चा उच्चार करून तीन पार्वणे करावी. तिघेही जिवंत असता पितृपार्वणाचा लोप करावा. त्या ठिकाणी सुतसंस्काराप्रमाणे आपल्या संस्कारामध्ये माता व मातामह यांच्या दोन पार्वणांनीच नान्दीश्राद्धाची सिद्धि होते. पिता इत्यादि तिघे आणि माता व मातामह जिवंत असतील तर प्रपितामहाचा पिता इत्यादिकांच्या उद्देशाने तीन पार्वणे करून नान्दीश्राद्ध करावे. याप्रमाणे प्रथम विवाहाचे वेळीही, दुसरा कर्ता नसल्याने वर स्वतः नान्दीश्राद्ध करणारा असेल तर मृतपितृक असेल त्याने आपला पिता इत्यादिकांच्या उद्देशाने, आणि जिवत्पित्रुक असेल तर पित्याचा पिता इत्यादिकांच्या उद्देशाने पार्वणे करून नान्दीश्राद्ध करावे. पिता व पितामह दोघे जिवंत असतील तर पितामहाचा पिता इत्यादिकांच्या उद्देशाने तीन पार्वणे करावी. प्रपितामह देखील जिवंत असेल तर प्रपितामहाचा पिता इत्यादिकांच्या उद्देशाने पार्वणे करून अथवा पितृपार्वणांचा लोप करून नान्दीश्राद्ध करावे. या ठिकाणी सर्वत्र पित्याचा पिता अथवा पित्याचा पितामह यांचा उच्चार करून पितृपार्वण करण्याचा पक्ष असेल तर, आपली माता व मातामह मृत असतील तथापि आपल्या स्वतःचे मातृपार्वण अथवा मातामहपार्वण न करिता पित्याची माता व मातामह यांचीच पार्वणे करावी, असे जाणावे. याप्रमाणे जीवत्पितृकाच्या नान्दीश्राद्धाचा प्रयोग सांगितला.