आचमन करून प्राणायाम केल्यावर देशकालादिकांचा उच्चार करावा, व
"श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थ सायमौपासनहोमं प्रातरौपासनहोमं वामुक द्रव्येण करिष्ये"
असा संकल्प करून
"चत्वारिश्रृंगा०" मंत्र म्हणून अग्नीचे ध्यान करावे. नंतर हस्तामध्ये उदक घेऊन तीन वेळ परिसमूहन करावे, तीन वेळ दर्भाचे परिस्तरण करावे व तीन वेळ उदक प्रोक्षण करावे. समिधायुक्त होमद्रव्य उत्तरेच्या बाजूस ठेवलेले असेल ते प्रज्वलित अशा दर्भाने प्रकाशित करावे. नंतर उदकाने प्रोक्षण करून तोच दर्भ तीन वेळा अग्नीच्या भोवती फिरवून टाकावा. होमद्रव्य अग्नीच्या पश्चिमेला दर्भावर ठेवून
"विश्वानि नो०" या मंत्राने अग्नीची पूजा करून मनाने प्रजापतीचे ध्यान करीत असता समिध अग्नीवर देऊन मनातच त्याग म्हणावा. समिध प्रदीप्त झाल्यावर शंभर तांदुळांची
"अग्नये स्वाहा" या मंत्राने सायंकाळी पहिली आहुति व "सूर्याय स्वाहा" या मंत्राने प्रातःकाळी पहिली आहुति आणि शंभरांहून अधिक तांदुळांची "प्रजापतये०" असा मनात उच्चार करून होम व त्याग करून दोन्ही वेळेस दुसरी आहुति द्यावी. परिस्तरण घातलेले दर्भ काढून परिसमूहन व पर्युक्षण करून उपस्थान करावे-
"अग्न आयूंशीतितिसृणां शतंवैखानसाअग्निःपवमानोगायत्री अग्न्युपस्थानेविनियोगः अग्नेत्वन्न इतिचतसृणां गौपायनाबन्धुः सुबन्धुः श्रुतबन्धुर्विप्रबन्धुश्चाग्निर्द्विपदाविराट अग्न्युपस्थानेवि० प्रजापतेहिरण्यगर्भःप्रजापतिस्त्रिष्टुप प्रजापत्युपस्थानेविनियोगः तंतुंतन्वन्देवाअग्निर्जगतीयद्वा देवाप्रजापतिर्जगती उपस्थानेविनियोगः हिरण्यगर्भोहिरण्यगर्भःप्रजापतिस्त्रिष्टुप् प्रजाप्रत्युप०"
हे मंत्र वायव्य दिशेकडे उभे राहून म्हणून उपस्थान झाल्यावर बसावे. इतके झाल्यानंतर "मानस्तोके०" इत्यादि मंत्राने विभूतिधारण करावे, असे क्वचित ग्रंथामध्ये सांगितले आहे. यानंतर विष्णूचे स्मरण करून
"अनेन होमकर्मणा परमेश्वरः प्रीयताम"
असे म्हणून कर्म ईश्वराला अर्पण करावे. प्रातःकाळी उपस्थान करण्याचे मंत्र-
"सूर्योनोदिवःसूर्यश्चक्षुःसूर्योगायत्री सूर्योप० उदुत्यंकाण्वःप्रस्कण्वःसूर्योगायत्री सूर्योप० चित्रंदेवानामाङ्गिरसःकुत्सःसूर्यस्त्रिष्टुप सूर्योप० नमोमित्रस्यसुर्योभितपाःसूर्योजगती सूर्यो० ।"
या चार मंत्रांनी आणि पूर्वी सांगितलेल्या प्रजापति देवतेच्या तीन मंत्रांनी प्रातःकाली उपस्थान करावे. कोणी प्रातःकाली "तंतुं तन्वन०" हा मंत्र म्हणत नाहीत. पत्नी अथवा कुमारी होम करणार्या असतील तर ध्यान, उपस्थान, इत्यादिकांचे ठिकाणी मंत्र वर्ज्य करावे.