नदी इत्यादि तीर्थावर जाऊन शेंडीला गाठ मारून, गुडघ्यापेक्षा जास्त उदक असेल तेथे उभा राहून कमी असेल तेथे खाली बसून आचमन करावे; व
"मम कायिकवाचक मानसिक दोष निरसनपूर्वक सर्वकर्मसु शुद्धिसिध्यर्थ प्रातःस्नानं करिष्ये"
असा संकल्प करून उदकाला नमस्कार करावा. पूर्वाभिमुख अथवा प्रवाहाभिमुख होऊन तीन वेळा बुडी मारून अंग धुवावे. स्नान केल्यावर दोनदा आचमन करून "आपोहिष्ठा०" या मंत्राने मार्जन करून "इमं मे गंगे०" या मंत्राने तीन वेळ उदक ढवळून "ऋतं च०" या सूत्राने (कात्यायनशाखी असतील त्यांनी "द्रुपद०" या ऋचेने) अघमर्षण करावे. उदकामध्ये बुडी मारून स्नान करून आचमन करावे. नंतर जलतर्पण विकल्पेकरून करावे. ते तर्पण असे -उपवीति करून
"ब्रह्मादयो ये देवास्तान्देवांस्त० भूर्देवान०" इत्यादि, निवीती करून "कृष्णद्वैपायनादयोये ऋषयस्तान० इत्यादि आणि प्राचीनावीति करुन "सोमःपितृमान्यमोग्गिरस्वानग्निष्वात्तादयो ये पितरस्तान०' इत्यादि प्रकारे तर्पण करावे. एका नदीमध्ये स्नान करीत असता दुसर्या नदीचे स्मरण करू नये. या ठिकाणी तैत्तिरीय शाखी इत्यादिकांनी तर्पणामध्ये ऋषि इत्यादिक दुसर्या देवता घ्याव्या असे सांगितले आहे. परंतु संक्षेपविधीमध्ये तर्पणाचा विकल्प आहे म्हणून त्या येथे सांगितल्या नाहीत.