उत्सव समाप्त झाल्यावर, मंगलकार्य केल्यावर, सुह्रद, बांधव यांना निरोप दिल्यावर आणि इष्ट देवतेचे अर्चन केल्यावर स्नान करू नये. सचैल स्नान, तिलतर्पण, प्रेताबरोबर जाणे, कुंभदान, अपूर्वतीर्थाचे व अपूर्व देवाचे दर्शन ही कृत्ये मंगलकार्य झाल्यानंतर एक वर्षपर्यंत करू नयेत. विवाहादिक, व्रताचा प्रारंभ ही केली असता सहा महिनेपर्यंत जीर्ण पात्रांचा त्याग, आणि घर झाडणे, सारवणे, इत्यादिक करू नयेत. पुत्राचा विवाह केल्यानंतर आणि व्रतबंध केल्यानंतर पित्याने आपले मुंडन अनुक्रमे एक वर्षपर्यंत आणि सहा महिनेपर्यंत करू नये. चौलकर्मानंतर तीन महिनेपर्यंत आणि इतर संस्कारानंतर एक महिनापर्यंत पिंडदान, मृत्तिकास्नान, तिलतर्प्ण ही करू नयेत. विवाह, व्रतबंध, चौल या संस्कारानंतर अनुक्रमे एक वर्ष, सहा महिने व तीन महिनेपर्यंत आणि इतर नांदीश्राद्धयुक्त मंगलकार्य झाल्यानंतर एकमहिनापर्यंत पिंडदान, तिलतर्पण यांचा जो हा निषेध सांगितला तो त्रिपुरुष संपिंडाना जाणावा. याप्रमाणेच मुंडनाचा निषेधही त्रिपुरुषसपिंडाचा जाणावा. ’व्रतबंध, विवाह ही मंगलकार्ये आहेत’ असा पक्ष घेतल्यास मौजीनंतर मुंडनाचा निषेध आहे. ’व्रतबंध मुंडनरूप आहे’ या पक्षी निषेध नाही. ’आपले मुंडन करू नये’ असे जे सांगितले त्यावरून कर्माचा अंगत्वाने प्राप्त झालेले व रागप्राप्त अशा मुंडनाचा निषेध सांगितला आहे. याविषयी अपवाद-गंगा, भास्करक्षेत्र, मातापितरांचा मृतदिवस, आधान, सोमयाग वगैरे, दर्शादि यांचे विषयी क्षौर इष्ट आहे. महालय, गवाश्राद्ध, मातापितरांचे प्रतिसांवत्सरिक श्राद्ध सपिंडीपर्यंत प्रेतकर्म, षोडशश्राद्धे यामध्ये विवाह केलेला असेल त्यानेही पिंडदान व तिलतर्पण ही करावी. भ्राता, पितृव्य इत्यादिकांचे प्रातिसांवत्सरिक श्राद्ध यांमध्येही पिंडदान व तिलतर्पण करावी असे कोणी ग्रंथकार म्हणतात. याप्रमाणे पिंडपितृयत, अष्टका, अन्वष्टका आणि पूर्वेद्युः ही श्राद्धे यामध्ये पिंडदानाचा निषेध नाही. दर्शश्राद्ध पिंडरहितच करावे. यावरून ऋक्शाखीयांना व्यतिषंग (दोन्ही समानकाली करणे) नाही. याप्रमाणे मंडपोद्वासनानंतर कोणती कर्मे करावी व कोणती करू नयेत यासंबंधाचा निर्णय सांगितला.