दहा पळे (३३ तोळे ४ मासे) वजन तांबे घेऊन त्याचे सहा अंगुळे उंच व बारा अंगुळे विस्तृत असे घटिकायंत्र करावे. असे निर्णयसिंधूमध्ये सांगितले आहे. भागवतामध्ये
"द्वादशार्धपलोन्मानं चतुर्भिश्चतुरंगुलैः ।
स्वर्णमाषैः कृतच्छिद्रं यावत्पस्थजलप्लुतम ॥
असे सांगितले आहे. याचा अर्थ - ऐशी गुंजाचा एक कर्ष; यालाच सुवर्ण अशी संज्ञा आहे. चार कर्श म्हणजे एक पल. अशी सहा पले वजन तांबे घेउन त्याची घटिका करावी. वीस गुंजा सोन्याची शलाका चार अंगुळे लांबीची करून त्या शलाकेने घटिकेच्या मुळाला छिद्र पाडावे. नंतर त्या छिद्राने घटिकापात्रात एक प्रस्थपरिमित उदक शिरते. तितके उदक भरले म्हणजे घटिकापात्र उदकात बुडते. ते पात्र एका घटिकेचे प्रमाण आहे. त्या प्रस्थाचे प्रमाण- सोळा पले म्हणजे एक प्रस्थ होतो. कारण "चार सुवर्ण म्हणजे एक पल, चार पले म्हणजे एक कुडव, चार कुडव म्हणजे एक प्रस्थ म्हणजे एक आढक, चार आढक म्हणजे एक द्रोण आणि चार द्रोण म्हणजे एक खारिका" असे वचन आहे. दुसर्या ग्रंथात "चार मुष्टि म्हणजे एक कुडव, चार कुडव म्हणजे एक प्रस्थ" असे सांगितले आहे, ’गुरु’ शब्द साठ वेळा उच्चारण्यास जितका काळ लागतो तितका काळ म्हणजे एक पल व अशी साठ पले म्हणजे एक घटिका असे कोणी ग्रंथकार म्हणतात. या प्रमाणाने तयार केलेले घटिकायंत्र सूर्यमृत्तिकेच्या भांड्यामध्ये ठेवावे. त्याचा मंत्र
"मुख्यं त्वमसि यन्त्राणां ब्रह्मणा निर्मितं पूरा ।
भव भावाय दंपत्योः कालसाधनकारणम् ॥
या मंत्राने गणपति व वरुण यांची पूजा करून घटिकायंत्राची स्थापना करावी. याप्रमाणे स्थापन केलेले घटिकायंत्र आग्नेय, दक्षिण, नैऋत्य अथवा वायव्य या दिशांकडे गेले तर शुभ नाही. मध्ये राहिले अथवा अन्य दिशांकडे गेले तर शुभ होय. याप्रमाणे आग्नेय वगैरे पाच दिशांकडे घटिका पूर्ण झाली तर शुभ नाही. याप्रमाणे घटिका यंत्राचा विचार सांगितला.