वधूवरांनी पूर्वी सांगितलेल्या लक्षणांनी युक्त अशा वेदीवर मंत्रघोषाने आरोहण करून वराने आपल्या जागी बसावे व वधूला आपल्या दक्षिणेस बसवावे. नंतर देशकालादिकांचा उच्चार करून
"प्रतिगृहीतायामस्या वध्वां भार्यासिद्धये विवाहहोमं करिष्ये"
असा संकल्प करून आपल्या गृह्यसूत्राप्रमाणे विवाहहोम करावा. या वेळेपासून विवाहाग्नीचे रक्षण करावे. रक्षण केलेला अग्नि चतुर्थीकर्मपर्यंत गृहप्रवेशनीय होमाच्या पूर्वी नष्ट होईल तर विवाहहोम पुन्हा करावा. गृहप्रवेशनीय होमानंतर नष्ट होईल तर दोन्ही होम पुन्हा करावे. बारा दिवसपर्यंत गृह्याग्नि नष्ट झाल्यास वृतीमध्ये सांगितलेली "अयाश्चा०" ही आहुति द्यावी, असा जो सार्वत्रिक नियम आहे त्याचा आधार घेऊन या ठिकाणीही "अयाश्चा०" आहुतीच द्यावी असे कोणि ग्रंथकार म्हणतात.