घरी स्नान करावयाचे ते उष्णोदकाने करावे, शीतोदकाने करू नये. त्याचा विधि पात्रामध्ये शीतोदक घालून त्यावर उषोदक घालावे.
"शंनो देवी० । आपः पुनं तु० । द्रुपदादिवे० । ऋत च० । आपोहिष्ठा० ।"
या पाच ऋचांनी ते उदक अभिमंत्रण करून
"इमं मे०"
इत्यादि मंत्रांनी तीर्थाचे स्मरण करीत स्नान करावे. गृहस्नानाविषयी संकल्प, आचमन, अघमर्षण आणि तर्पण ही नाहीत. स्नानानंतर आचमन व मार्जन ही करावी. याप्रमाणे स्नान केल्यावर वस्त्राने अथवा हाताने अंगावरील पाणी न पुसता कोरडे कापसाचे वस्त्र परिधान करून वरच्या बाजूने ओले वस्त्र काढावे. कच्छरहित (कासोटा न घातलेला), उत्तरीय वस्त्ररहित, नग्न, वस्त्ररहित अशा पुरुषाला श्रौत अथवा स्मार्त कर्माविषयी अधिकार नाही. दुहेरी वस्त्र धारण करणारा, दग्धवस्त्र धारण करणारा, शिवलेले व ग्रंथियुक्त वस्त्र धारण करणारा. भगवे वस्त्र धारण करणारा आणि दिगंबर हे सर्व नग्न होत. पिळलेले वस्त्र खांद्यावर ठेवू नये. वस्त्र पिळावयाचे ते घरी चोहेरी करून खाली दशा करून भूमिवर पिळावे, नदीच्या काठी वर दशा करून पिलावे. तिहेरी वस्त्र पिळू नये. ज्यांचा पिता व ज्येष्ठ भ्राता जिवंत आहे त्यांनी उत्तरीय वस्त्र धारण करू नये. पांघरावयाचे वस्त्र सर्वांनी धारण करावे. याप्रमाणे नित्य असे प्रातःस्नान सांगितले. (मध्याह्नस्नान देखील नित्य आहे असे कोणी ग्रंथकार म्हणतात)