पिता, माता, पितामह, पितामही, चुलता, पूर्वीची पत्नी, पूर्वीच्या पत्नीचा पुत्र, भ्राता, विवाह न झालेली बहीण यापैकी कोणी मरण पावले असता विशेष प्रतिकूल आहे. करिता विवाह करू नये. याहुन इतर त्रिपुरुषसपिंडापैकी कोणी मरण पावल्यास शांति इत्यादिकांनी दोषाचा परिहार करून विवाह करावा. संकट असेल तर पिता इत्यादि मृत झाले असताही कालप्रतीक्षा व शांति यांनी दोष दूर करून विवाह करावा. त्याविषयी निर्णय - विवाहाचा निश्चय केल्यानंतर माता व पिता ही दोघेही मरण पावतील तर कालप्रतीक्षा व शांति यांनी दोषाचे निरसन होत नाही याकरिता विवाह करू नये. माता अथवा पिता यांपैकी कोणी एक मृत झाल्यास शांति वगैरे करून विवाह करावा. त्यामध्ये "पित्यासंबंधी एक वर्षपर्यंत आशौच, मातेचे सहा महिने, पूर्वीच्या भार्येचे तीन महिने, भ्राता व पुत्र यांचे दीड महिना, इतर सपिंडांचे एक महिना. याप्रमाणे विवाहाविषयी आशौच असते. आशौच संपल्यावर शांति करून नंतर विवाह करावा." "प्रतिकूल असताना सहा महिनेपर्यंत विवाह करू नये." "सपिंडाचे मरणामुळे प्रतिकूल असेल तर एक महिनापर्यंत विवाह वर्ज्य करावा." इत्यादि वाक्यांच्या आश्रयाने व्यवस्था सांगतो - या ठिकाणी 'आशौच' शब्दाने प्रतिकूलाने होणारा विवाहाचा अनधिकार मात्र कालप्रतीक्षा करण्याकरिता सांगितला. म्हणून पिता मृत झाल्यास एक वर्षानंतर विनायक शांति करून संकट असेल तर विवाह करावा. अतिसंकट असेल तर सहा महिन्यांनी विनायकशांति व श्रीपूजनादि शांति करून विवाह करावा. त्याहून अत्यंत संकट असेल तर एक महिन्यापर्यंत दोन शांति (विनायक शांति व श्रीपूजनादि शांति) करून विवाह करावा. असे संकटाचे कमीजास्ती प्रमाणाने तीन पक्ष होतात. माता मृत झाल्यास सहा महिन्यानंतर विनायक शांति करून विवाह करावा. अति संकट असेल तर एक महिना झाल्यावर दोन शांति करून विवाह करावा. "ज्याचा पिता व माता मृत झाली त्याचा देह एक वर्षपर्यंत अशुचि असतो; एक वर्ष पूर्ण होईपर्यंत त्याने देवकर्म व पितृकर्म ही करू नयेत." या वचनाने पिता अथवा माता यांचे निधनानंतर एक वर्शपर्यंत सर्व शुभकर्माविषयी जो निरोध सांगितला आहे तो विवाहाचा निश्चय झाल्यानंतर पिता अथवा माता मृत होईल तर, किंवा संकट नसेल तर जाणावा. भार्या मरण पावली असता तीन महिने अथवा एक महिना झाल्यावर श्रीपूजनादि शांति करावी. भ्राता मरण पावला तर दीड महिना अथवा एक महिना झाल्यावर विनायकशांति करावी. पुत्र मृत होईल तर दीड महिना अथवा एक महिना गेल्यावर श्रीपूजनादि शांति करावी. चुलता मृत होईल तर एक महिन्याने विनायक शांति करावी. पितामही अथवा विवाह न झालेली बहीण मरण पावेल तर एक महिन्याने श्रीपूजनादि शांति करावी. ह्याहून अन्य त्रिपुरुष सपिंड मरण पावेल तर एक महिन्याने श्रीपूजनादि शांति करावी. याप्रमाणे शांति केल्यानंतर विवाह करावा. अति गुणवती अशी माता मृत होऊन सहा महिन्यानी मनाचे दुःख न गेल्यास एक वर्षपर्यंत वाट पहावी. याप्रमाणे अति गुणवती भार्या मृत झाल्यास सहा महिनेपर्यंत वाट पहावी; ज्योतिःप्रकाश ग्रंथामध्ये 'माता इत्यादिक मृत झाल्यावर एक महिन्याहून अधिक वाट पहाणे अति संकटाचे योगाने असंभवनीय असेल तर अथवा मासामध्येही दहा दिवसांनंतर काही दिवस वाट पाहून वर सांगितलेल्या व्यवस्थेने विनायक शांति व श्रीपूजनादि शांति करून गाईचे दान करून पुन्हा वाग्दान वगैरे करावे' असे सांगितले आहे. हे सर्व अपवाद संकट असेल तरच शहाण्या लोकांनी कमी-ज्यास्ती प्रमाणाने योजावे. अल्प संकट असून त्याला महासंकटाचा विधि सांगितला तर सांगणारा व करणारा या दोघांनाही दोष लागतो. दुर्भिक्ष, राष्ट्राचा नाश वगैरे भय, माता अथवा पिता यांच्या मरणाची शंका ही असता प्रतिकूलाचा दोष नाही, फार दिवसांचा रोगी, दूरदेशी वास्तव्य करणारा, विरक्त यांना आणि कन्या प्रौढ झाली असता प्रतिकूलाचा दोष नाही. याप्रमाणे अपवाद समजावा.